

85060
पेढ्यांना मागणी; भेसळयुक्त खव्याची चलती
कठोर कारवाईची गरज; दहावी, बारावी निकाल सुगीचे दिवस
गणेश शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २१ : बारावीच्या निकालानंतर पेढ्यांना मागणी वाढली आहे. बारावी, दहावी निकालाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी गेल्या आठवडाभरापासून खव्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. कोल्ड स्टोरेजला खव्याचा स्टॉक केल्याने खव्याची चवही बदलली आहे. दरम्यान निकालाच्या पार्श्वभूमीवर पेढ्यांची मागणी लक्षात घेऊन बाजारात सध्या भेसळयुक्त खव्याची विक्री वाढली आहे. परिणामी ग्राहकांना चांगल्या दर्जाचे पेढे देऊ शकत नसल्याची खंत पेढे व्यापाऱ्यांनाही वाटत आहे.
बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. आठवडाभरात दहावीचाही निकाल लागण्याची शक्यता आहे. या काळात पेढ्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या संधीचे सोने करण्यासाठी बहुतांश खवा उत्पादकांनी खवा कोल्ड स्टोअरेजमध्ये स्टॉक करून ठेवला होता तर दुसऱ्या बाजूला या व्यवसायातील काही अपप्रवृत्तींनी भेसळयुक्त खवा व्यापाऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. यातून त्याच दर्जाच्या पेढ्यांची निर्मिती केली जात आहे. खवा चांगला मिळत नसल्याने पेढ्यांचा दर्जाही ग्राहकांना समाधान देऊ शकत नाही.
शिरोळ तालुक्यातील चिंचवाड येथे भेसळयुक्त दूध निर्मिती केली जात होती. एकाच वेळी गावातील पाच ते सहा ठिकाणी पामतेल, युरिया व केमिकलच्या सहाय्याने भेसळयुक्त दूध निर्मितीचा प्रकार तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप कदम यांच्या कारवाईने उधळून लावला होता. यानंतर तालुक्यातील भेसळयुक्त खव्याचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. खास करून म्हशीच्या दुधापासून चांगल्या दर्जाच्या खव्याची निर्मिती होऊ शकते. मात्र, उत्पादन खर्च कमी करण्याच्या नादात अनेक खवा उत्पादकांकडून म्हशीच्या दुधाऐवजी गाईचे दूध, हलक्या प्रतीची दूध पावडर, मका पावडरचा वापर करून खव्याची निर्मिती केली जात आहे. सर्वसाधारणपणे ४० लिटर म्हशीच्या दुधापासून दोन ते साडेतीन तास दुधाची घटवणी केली, तर दहा किलो चांगल्या दर्जाचा खवा मिळू शकतो.
मात्र, गाईचे दूध आणि हलक्या दर्जाच्या दूध पावडरमुळे कमी कालावधीत खव्याची निर्मिती होते. मात्र, हा खवा पेढ्यासाठी उपयुक्त नसतो. खव्यापासून पेढ्यांची निर्मिती करून एक-दोन दिवसात त्याची विक्री करण्यासाठीच मोठ्या प्रमाणावर भेसळीचा खवा बाजारात आणण्याचा घाट घातला जातो. भेसळयुक्त खव्यापासून चांगल्या दर्जाच्या पेढ्याची किंमत वसूल करण्याचा फंडा सध्या सुरू आहे. यावर नियंत्रण आणायचे असेल, तर अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाने आमिषांना बळी न पडता संबंधितांवर कठोर कारवाईची गरज आहे.
....
चांगल्या प्रतीचा पेढा
* चव न सोडता आठ दिवस टिकू शकतो
* म्हशीच्या चांगल्या फॅटपासून बनविलेला असावा
* सर्वसाधारणपणे ४० लिटर दुधाची तीन तास आटवणी हवी
* तांबूस रंगाचा खवा दर्जेदार असतो
* पेढ्यासाठी आकार देताना हाताला तूप लागून पेढ्याला चकाकी येते
....
भेसळयुक्त खव्याचा पेढा
* पेढ्याचा रंग पांढरा
* दोन दिवस टिकण्याची क्षमता
* दोन दिवसानंतर आंबट, बुरशीला सुरुवात
* हलक्या दर्जाची दूध पावडर, मका पावडरचा वापर
* उत्पादन खर्च कमी व कमी वेळेत आटवणी
-----------
बीड, लातूरच्या खव्याचा वापर
गाईचे दूध, हलक्या प्रतीची दूध पावडर, मका पावडरच्या सहाय्याने बनवलेल्या पांढऱ्या शुभ्र खव्याला खवा उत्पादकांची मागणी आहे. हा खवा कमी दरात उपलब्ध होतो. एसटीच्या माध्यमातून हा खवा व्यापाऱ्यांना सहजपणे दिला जातो. या खव्याची गुणवत्ता तपासण्याची गरज आहे.
....
गेल्या ३२ वर्षांपासून आम्ही मिठाई विक्रीच्या व्यवसायात आहोत. २०१० पर्यंत चांगल्या प्रतीचा खवा पेढ्यांसाठी उपलब्ध होत होता. अलीकडच्या काळात मात्र पेढ्यासाठी गुणवत्तापूर्ण खवा मिळवणे जिकिरीचे झाले आहे. बऱ्याचदा हलक्या दर्जाचा खवा आम्ही व्यापाऱ्यांना परत पाठवून देतो. ग्राहकांना चांगल्या प्रतीचा पेढा उपलब्ध करून द्यावा, हा आमचा प्रयत्न असतो.
- शिवाजी सन्नके, मिठाई व्यावसायिक, जयसिंगपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.