
कळे: मोरेवाडी येथील बालक नदीत बुडाले
●फोटो ओळ: १.) सम्राट मोरे,
२.)रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
02530, 02531
मोरेवाडी येथे मुलगा नदीत बुडाला
शोध सुरू; चुलत भावंडे पोहताना घटना
कळे, ता. ३०: मोरेवाडी (ता. पन्हाळा) येथील नऊ वर्षांचा मुलगा नदीत बुडाला. सम्राट सचिन मोरे (वय ९) असे त्याचे नाव आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कुंभी नदीवरील सावर्डे-मोरेवाडी पाणवठ्यावर सम्राट व त्याचा चुलत भाऊ श्रेयस पंडित मोरे (वय ९) हे दोघे पोहायला गेले होते. दोघांनाही पोहायला येत नव्हते. ते नदीकाठावर पोहू लागले. काही वेळाने श्रेयस पाण्यातून बाहेर आला. सम्राट एकच मिनिटात आलो असे म्हणत पाण्यात गेला. प्रवाहाच्या दाबाने तो नदीत खेचला गेला व बुडाला. श्रेयस आरडाओरडा करत गावात गेला. लोक जमा झाले. खोल पाण्यात शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नाही. माजी सरपंच विलास गुरव यांनी कळे पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार महादेव खाडे, पोलिस नाईक राहुल पोवार, कॉन्स्टेबल अमोल भोसले व रेस्क्यू टीमचे पोहाळे येथील सौरभ पाटील यांनी आपल्या साथीदारांच्या साहाय्याने शोध घेतला. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे प्रमुख सुनील कांबळे आपल्या शोधपथकासह हजर झाले. रात्री उशिरापर्यंत पाणबुडीच्या साहाय्याने शोध घेतला. अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळे येत असल्याने शोध थांबविण्यात आला. मंगळवारी (ता.३१) पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kae22b01794 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..