
जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत पाणीपुरवठा योजना वाद
नळपाणी पुरवठा योजनेबाबत कबनूरला मतभेद
कबनूर ता. ७ : जलजीवन मिशन कार्यक्रमअंतर्गत कबनूर नळ पाणीपुरवठा योजना सक्षमतेने चालण्यासाठी व नागरिकांना खर्चाचा भुर्दंड पडू नये, नळ कनेक्शनसाठी अनाठायी खर्च येऊ नये, म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तरतूद करावी. नळपाणीपुरवठा योजनेसाठी पाईपलाईन होत असताना ९५ किलोमीटर रस्ते खोदाई होणार आहे. खोदलेल्या रस्त्यांची सुधारणासाठी अपुरी तरतूद केली आहे. ही योजना अखंडितपणे चालविण्यासाठी सोलर सिस्टिम शासन राबवीत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तरतूद वेळोवेळी सांगूनही केली नाही. तेव्हा याबाबत लेखी हमी द्यावी. मगच योजनेचे काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, सुधीर लिगाडे यांच्यासह नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत केली.
जलजीवन मिशन कार्यक्रमअंतर्गत कबनूर नळ पाणीपुरवठा योजनेतील एचडीपीई पाईपच्या तीन ट्रक कबनूर जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी आले असता ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी पाईप उतरवण्यास तीव्र विरोध केल्याने एचडीपीई पाईपचे ट्रक दुसरीकडे नेले. त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यासंदर्भात मतभेद निर्माण झाले आहेत. त्याबाबत खुलाशासाठी आज ग्रामपंचायत सभागृहात नऊ सदस्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सदस्य सुधीर पाटील,सुधीर लिगाडे,सैफ मुजावर,सुनील काडाप्पा,प्रवीण जाधव,समीर जमादार,वैशाली कदम,स्वाती काडाप्पा,सुनिता अडके उपस्थित होते.
चौकट -
...अन्यथा ग्रामपंचायतीवर कारवाई
जलजीवन मिशन कार्यक्रमअंतर्गत कबनूर नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपसाठी जागा द्यावी. पुढील कामे हाती घेण्याबाबत अभिप्राय त्वरित कळवावा. अन्यथा ग्रामपंचायतीस जबाबदार धरून योग्य ती कारवाई होईल. याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग इचलकरंजी उपविभाग अभियंता जे. डी. काटकर यांनी सरपंच शोभा पोवार यांना पत्राद्वारे कळवले आहे.
कोट
गावाचे हित साधण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत कबनूर नळ पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण करून घेण्यासाठी वचनबद्ध आहे. त्या दृष्टीने मी पाठपुरावा करणार आहे.
-शोभा पोवार, सरपंच, कबनूर