
कबनूरला ग्रामपंचायत कामगारांचा सोमवारी संप
कबनूरला ग्रामपंचायत कामगारांचा सोमवारी संप
कबनूर, ता. १८ ः येथील ग्रामपंचायत कामगारांना औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सोमवारी (ता.२२) एक दिवसाचा संप पुकारला आहे, अशी माहिती कामगार नेते, श्रमिक जनरल संघटनेचे सरचिटणीस आप्पा पाटील यांनी दिली.
कबनूर ग्रामपंचायत कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळावा यासाठी वारंवार आंदोलने केली होती, मात्र सरपंच, ग्रामसेवक व इतर ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी नवीन वेतन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे पाटील यांनी न्यायालयात दाद मागितली होती. याबाबत न्यायालयाने मार्च २०२३ चा पगार सुधारित किमान वेतनाप्रमाणे देण्याचा आदेश दिला होता, मात्र याबाबतीतही सरपंच व ग्रामसेवक यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. याबाबतीत न्यायालयाच्या आदेशाच अपमान केला आहे म्हणून फौजदारी दावा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात सोमवारी एक दिवसाचा संप पुकारला आहे.