निमशिरगावात साकारतेय रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे स्मारक

निमशिरगावात साकारतेय रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे स्मारक

निमशिरगावात साकारतेय
रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे स्मारक

रवींद्र पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. ३० ः पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या निमशिरगाव (ता. शिरोळ) या जन्मभूमीत स्मारक समितीतर्फे लोकसहभागातून देशभक्त, पद्मश्री, डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार स्मारक आणि संविधान संकुल उभारण्यात येत आहे.
स्मारकामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे प्रसंग, त्यातील आंदोलने, त्यांचे नेते, स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचा सहभाग, देशभक्त रत्नाप्पाण्णांचे संघटन आणि नेतृत्व, त्यातील महत्त्वाचे प्रसंग यांचे प्रेरणादायी प्रदर्शनाचे दालन, सभागृह, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्र, व्यायाम शाळा, पुरुष व महिलांचे स्वतंत्र निवासस्थान, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.
संविधान संकुलामध्ये संविधानाची निर्मिती प्रक्रिया, संविधान सभेची रचना आणि त्यातील चर्चा, संविधानाचे अंतरंग, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य आदी बाबतीत महत्त्वपूर्ण माहिती प्रदर्शनाचे दालन उभारण्यात येत आहे.
लोकशाहीचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी नागरिकांना तसेच लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देणारे केंद्र, युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास, कौशल्य विकास, विविध स्पर्धा परीक्षा तसेच त्यांच्या सामाजिक व राजकीय संकल्पनांचा विकास व्हावा यासाठी प्रशिक्षण व निवासी शिबिराची सोय केली जाणार आहे. महिलांचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक आणि कौशल्य विकास आदी संदर्भातील प्रशिक्षण केंद्र, योगा, प्राणायामविषयी प्रशिक्षण, आरोग्य शिबिर, आरोग्यविषयी शासनाच्या योजना आणि सवलती याबाबत मार्गदर्शन केंद्र आदींचा समावेश असणार आहे.
स्मारक आणि संविधान संकुलासाठी सुमारे सात कोटी खर्च आहे. स्मारकासाठी जागा आणि पंचवीस लाखांचा निधी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या रजनीताई विश्वनाथ मगदूम यांनी दिला आहे. स्मारक व संविधान संकुलाचे भूमीपूजन १ मे रोजी झाले आहे. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनी वैयक्तिक तसेच संस्था, संघटना आदींच्यावतीने सुमारे पन्नास लाखांची मदत जाहीर केली आहे. त्यातील बहुतांश निधी जमा झाल्याने लवकरच स्मारक व संविधान संकुलाच्या कामाला गती येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com