
कसबा सांगाव: डेंगी सदृश्य आजाराचे १६ रुग्ण आढळून, साथ रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला
कसबा सांगावात डेंगीसदृश १६ रुग्ण
सहा संशयितांचे नमुने; आठवड्यातून एकदा येणाऱ्या पाण्यामुळे घरोघरी साठ्याचा परिणाम
कसबा सांगाव, ता. ६ ः येथे डेंगीसदृश आजाराचे १६ रुग्ण आढळले आहेत. सहा जणांचे नमुने जिल्हा प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. संभाव्य धोका रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सर्वेक्षण केले जात आहे. सहा महिन्यांत दुसऱ्यांदा असे रुग्ण आढळले आहेत. ग्रामस्थांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक एम. जी. वड्ड यांनी आरोग्य केंद्रात भेट देऊन कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
मस्जिद परिसर, माळी गल्ली, लबाजे गल्ली आदी भागांत डेंगीसदृश रुग्ण आढळले आहेत. सध्या १६ जणांना बाधा झाली आहे. रुग्ण आढळलेल्या भागात रुग्णांची माहिती घेणे, अळीनाशक औषधे पाण्यात टाकणे, याशिवाय पाणीसाठ्याची तपासणी केली जात आहे. यासाठी सात पथके कार्यरत आहेत. रिकामे आणि जुने टायर, नारळाच्या करवंट्या, सिमेंट टाकी, मातीची मडकी यांतील पाणी साठ्यामुळे अळ्यांची उत्पत्ती वाढत आहे. ग्रामपंचायतीकडून धूर फवारणी केली जात आहे. प्राथमिक लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. शिवाजी घुले, मधुकर लाटकर, महेश शिंदे, महादेव धनगर, बलराम गथंडे, सी. पी. शिंदे, कुमार पाटील आदींसह आशा कर्मचारी, वाय. डी. माने नर्सिंग कॉलेजमधील स्टाफ, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण सुरू आहे.
अनियमित पाणीपुरवठा
गावात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होतो. अनियमित पाण्यामुळे ग्रामस्थांना साठा करून ठेवावा लागतो. परिणामी स्वच्छ्ता राखणे शक्य होत नाही. त्यामुळे डेंगीच्या अळ्या वाढण्यास मदत होते. पाणीपुरवठा नियमित आणि कमी वेळेत झाल्यास साठा जास्त दिवस ठेवावा लागणार नाही आणि अशी साथ रोखणे शक्य होईल, असे बोलले जात आहे.
कोट
डेंगीच्या अळ्यांची उत्पत्ती रोखणे महत्त्वाचे आहे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, गटारे वाहती ठेवणे, धूर फवारणी, कचऱ्याची विल्हेवाट या उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
डॉ. पौर्णिमा शिंदे, वैद्यकीय अधिकारी.
Web Title: Todays Latest Marathi News Kbs22b00702 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..