कसबा सांगावला पाणी योजनेची दुसरी निविदा प्रक्रिया लांबली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा सांगावला पाणी योजनेची 
दुसरी निविदा प्रक्रिया लांबली
कसबा सांगावला पाणी योजनेची दुसरी निविदा प्रक्रिया लांबली

कसबा सांगावला पाणी योजनेची दुसरी निविदा प्रक्रिया लांबली

sakal_logo
By

कसबा सांगावला पाणी योजनेची
दुसरी निविदा प्रक्रिया लांबली
काम अंतिम टप्प्यात; पण नळ जोडणीची प्रतीक्षा
कसबा सांगाव, ता. ७ : येथे जलजीवन मिशन अंतर्गत बारा कोटींच्या पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नव्या योजनेची खोदाई करून जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही पन्नास टक्के लोकांचे नवीन नळ जोडणीचे काम अपूर्ण आहे. दुसऱ्या निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याने अनेकांना नळ जोडणी मिळण्यात अडचणी येत असून तत्काळ नळ जोडण्या मिळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
नवीन योजनेमुळे सुमारे पंचवीस वर्षांपासून भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय निघणार आहे. योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरीही जलकुंभ आणि जल शुद्धीकरण प्रकल्प आणि नवीन कनेक्शन जोडणीची कामे अद्याप अपूर्ण आहेत. संपूर्ण गावात एकूण तीन हजार कनेक्शन आहेत. लोकवर्गणीतून पहिल्या टप्प्यात निविदा निघालेल्या एकूण चौदाशे जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. मागील सहा महिन्यांपासून नवीन जोडणीचे काम सुरू आहे. मात्र, मागील एक महिन्यापासून दुसऱ्या टप्प्यातील सोळाशे नवीन नळ जोडणीचे काम निविदा प्रक्रियेअभावी रखडले आहे. यामुळे नवीन कनेक्शन मिळवण्यात ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बदल प्रस्ताव करण्यात आला असून अद्याप निविदा प्रक्रियेला अंतिम स्वरूप आलेले नाही. नवीन नळ जोडणीतून एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी जुन्या नळ जोडणीतून पाणीपुरवठा सुरू आहे. नवीन जोडणीसाठी ग्रामपंचायतीने अनेक वेळा आवाहन केले, ग्रामस्थांनी त्याला प्रतिसादही दिला. मात्र, सद्यस्थितीत नवीन जोडण्या थांबविण्यात आल्या आहेत. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ सर्व प्रक्रिया पूर्ण करून शंभर टक्के नवीन जोडण्या कराव्यात, अशी मागणी होत आहे.
---------------
कोट
शिल्लक नवीन जोडण्यांसाठी जिल्हा परिषदेकडे बदल प्रस्ताव पाठवला आहे. आठ दिवसांत सदरची प्रक्रिया पूर्ण होऊन ग्रामस्थांना नवीन नळ जोडण्या देण्यास सुरुवात होईल. उर्वरित ग्रामस्थांनी लोकवर्गणी देऊन सहकार्य करावे.
- आण्णासाहेब कुंभार, ग्रामविकास अधिकारी