
कसबा सांगाव: पत्नी, मुलाच्या खुनाबद्दल पतीवर गुन्हा दाखल, हलसवडे प्रकरण
हलसवडे शोकसागरात बुडाले
सांगवडेवाडी ....कसबा सांगाव, ता.२५ः एकाच वेळी आई-वडील आणि मुलाची अंत्ययात्रा निघाल्याने आज हलसवडे गाव शोकसागरात बुडून गेला. कुटुंबातील तीन मृतदेह आज एकाच वेळी स्मशानात नेण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी, तसेच त्यांच्या मित्रमंडळी नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती.आजही दुपारपर्यंत गावातील दुकाने, व्यवहार बंद होते.
दरम्यान, पत्नी राजश्री संदीप पाटील (वय ३२) व मुलगा सन्मित संदीप पाटील (वय ८) यांना जीवे मारण्याच्या हेतूने कसबा सांगाव हद्दीतील कालव्यात ढकलून देऊन खून केला. तसेच मुलगी श्रेया संदीप पाटील (वय १४) हिला पाण्यात ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी संदीप आण्णासो पाटील (वय ३५, रा. हलसवडे, ता.करवीर) याच्या विरोधात कागल पोलिसांत कलम ३२०, ३०७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसपाटील रामगोंडा आप्पासो पाटील यांनी याबाबतची फिर्याद कागल पोलिसांत दिली आहे.
शुक्रवारी(ता.२४) दुपारी बाराच्या सुमारास हुपरी येथील बँकेत जायचे आहे, असे सांगून संदीप याने पत्नी राजश्री, मुलगी श्रेया आणि मुलगा सन्मित यांना स्वतःच्या दुचाकीवरून कसबा सांगाव येथील कालवा परिसरात आणले होते. अज्ञात कारणावरून पत्नी, मुलगी आणि मुलग्याला कालव्यात ढकलून दिले होते. यात पत्नी राजश्री आणि मुलगा सन्मित यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. पोहता येत असल्याने सुदैवाने बचावलेल्या श्रेया हिला स्थानिक नागरिकांनी कालव्याबाहेर काढून कसबा सांगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, आरोपी संदीप याने कर्नाटक येथील भोज येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कागल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, जखमी श्रेयाला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
.....