कसबा सांगाव: ग्रॅव्हिटी कंपनीच्या बग्यास डेपोला वीज कोसळून आग, सुमारे ५० लाखांचे नुकसान, कसबा सांगाव हद्दीतील घटना

कसबा सांगाव: ग्रॅव्हिटी कंपनीच्या बग्यास डेपोला वीज कोसळून आग, सुमारे ५० लाखांचे नुकसान, कसबा सांगाव हद्दीतील घटना

1179

कसबा सांगाव ः येथील ग्रॅव्हिटी कंपनीच्या बगॅस डेपोला लागलेली आग.
.............

बगॅस डेपोवर वीज कोसळून आग

कसबा सांगाव येथील घटना ः ५० लाखांचे नुकसान, पंधराशे टन बगॅस खाक

कसबा सांगाव, ता.१६ ः कसबा सांगाव हद्दीतील इंदुमती राणी सरकार माळ भागात असलेल्या ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज कंपनीच्या बगॅस डेपोवर वीज कोसळून लागलेल्या आगीत पंधराशे टन बगॅस जळून खाक झाले. यात सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाचे जवान व कंपनीचे कामगार आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते.
याबाबत अधिक माहिती अशी,कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या दक्षिणेला कालव्याशेजारी ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज कंपनीच्या प्लॉट नंबर ८१२ मधील ३० एकर जागेत ३५ बगॅस डेपो आहेत. कंपनीत बगॅसपासून प्लायवूड बनविला जातो. प्रत्येक डेपोत बगॅसच्या ढेपांचे मोठमोठे थर रचलेले आहेत. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास कसबा सांगावसह परिसरात विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यादरम्यान तीनच्या सुमारास नऊ नंबरच्या डेपोवर वीज कोसळली आणि तेथील बगॅसने पेट घेतला. ही बाब काही कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी कंपनीच्या मालकांना याची माहिती दिली. त्यांनी तत्काळ औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाला पाचारण केले.
आगीचे रौद्र रूप पाहता कंपनीकडून कोल्हापूर महानगरपालिका, कागल नगरपालिका, शाहू साखर कारखाना, जवाहर साखर कारखाना यांसह काही पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या बोलाविल्या. दोन डेपोंमधील अंतर कमी-जास्त असल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या. जेसीबी मशिनच्या सहाय्याने बगॅसचे गठ्ठे बाजूला करत आग विझविताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. भिजलेल्या बगॅस आणि मातीमुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य झाले. कंपनीचे संचालक शंकरभाई पटेल, तुळशी पटेल, दर्शन पटेल, मॅनेजर डी. डी. पाटील, मधुकर गावडे, वाय. टी. पाटील आदींनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. दिवसभर आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com