लेख : श्री ज्योतिर्लिंग व मरगुबाई यात्रा विशेष दोनवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेख : श्री ज्योतिर्लिंग व मरगुबाई यात्रा विशेष दोनवडे
लेख : श्री ज्योतिर्लिंग व मरगुबाई यात्रा विशेष दोनवडे

लेख : श्री ज्योतिर्लिंग व मरगुबाई यात्रा विशेष दोनवडे

sakal_logo
By

डोके- श्री ज्योतिर्लिंग व मरगूबाई यात्रा विशेष, दोनवडे
-----------------------------

कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक
वेगवेगळ्या खेड्यांना, शहरांना ओळख मिळते ती त्या ठिकाणी होऊन गेलेल्या थोरा-मोठ्यांमुळे, नावलौकिक मिळविलेल्या माणसांमुळं. अशीही काही गावं असतात, ज्यांची ओळख त्या ठिकाणच्या माणसांमुळे तर असतेच; पण तेथील वृक्ष, प्राणी-पक्ष्यांमुळेही असते. या गावांत पहिल्यांदाच जाणाऱ्यांचे ते आकर्षण बनतात. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दोनवडे हे गाव पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले असे गाव आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात राज्यात नावाजलेले असे गाव आहे. येथील ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग व मरगूबाईची यात्रा मंगळवारी (ता. १०) होत आहे. यानिमित्त ....
-कुंडलिक पाटील, दोनवडे.

कोल्हापूर शहरापासून ते अगदी जवळ आहे. येथे एकोप्याने राहणारे असल्यामुळे, तसेच राजकीय, सहकार, क्रीडा क्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये राज्यातही नावाजले जाते. गावाला ‘दोनवडे नाव का पडले’ असा प्रश्न उभा राहतो. दोनवडे हे नाव ‘दोन वडाच्या’ म्हणजे गावात असणाऱ्या प्राचीन वटवृक्षावरून म्हणजे वडाच्या झाडावरून पडले आहे. तसेच गावात ग्रामदैवत जोतिर्लिंग, तसेच मरगूबाई, एकवीरा देवी, विठ्ठल-रखुमाई, म्हसोबा, विठ्ठलाई, थळ पांढर अशी देवस्थाने आहेत. मानाच्या पाटील, कदम पोवाळकर अशा मानाच्या तीन सासनकाठ्या दसऱ्याला उत्सवात असतात.
आपला भारत देश आंतरराष्ट्रीय पातळीवर तरुणांची संख्या जास्त असलेला देश म्हणून ओळखला जातो. तशी वृद्ध मंडळीही दोनवडे गावचा आपला इतिहास सांगताना म्हणतात की, या ‘दोनवडे’ गावात राहणारे वंशज हे मुंगीपैठण येथील देशमुख-पाटील घराण्यातील आहेत. पुरातन काळी त्यांच्या वंशजांचा मुंगीपैठण येथे तेथील नागरिकांसोबत काही कारणाने वाद झाल्याने त्यांना गाव सोडावे लागले. हे सर्व लोक मजल- दरमजल करीत. त्यांपैकी काही लोक भोगावती नदीकाठी स्थिर झाले व त्यांनी आपली वस्ती उभी केली.
पुरातन काही गावे, शहरे ही बहुधा नदीकाठीच वसली आहेत, हा इतिहास आहे. हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली. सुपीक जमीन व पाणी, शेतीसाठी पूरक वातावरणामुळे लोकसंख्या वाढत गेली व लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहू लागले. कालांतराने गावाला नाव प्राप्त झाले दोनवडे; पण नावाचा इतिहास फक्त पूर्वजांनी सांगितलेली माहिती हाच पुरावा आहे. एकदा गाव वसले तर देव तेथे आलेच. पूर्वजांनी गावाबाहेर कौलारू रुपात मंदिर बांधले. दगडी पाषाणातील जोतिबाच्या मूर्तीची स्थापना केली. मंदिराचे बांधकाम पांडवकालीन शैली असलेले होते. हे मंदिर अत्यंत सुंदर असून प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला सवर्ण लोकांची बसण्याची व्यवस्था आहे व डाव्या बाजूला इतर समाजातील जनतेची बसण्याची व्यवस्था बांधीव होते.
त्यानंतर वरती चढून गेल्यानंतर मंदिराचा हॉल होता. लाकडी रुफ काम व लाकडी खांबावर भार पेललेले मंदिर होते. मध्यभागी फक्त जोतिबाची एकच मूर्ती होती. मुख्य मंदिराच्या मागे चिंचेचे खूप मोठे झाड होते. मंदिराच्या उजव्या बाजूला सुरवातीला गणपती व हनुमान यांची छोटी मंदिरे होती. शेजारी पांढऱ्या चाफ्याचे खूप जुने झाड होते. त्या काळी प्रत्येक मुख्य सणाला मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम चालत असत. ग्रामस्थांचा उत्साह फार मोठा असे. जुन्या मंदिराच्या समोरील दीपमालेखालील दगडावर हे बांधकाम १८९२ मध्ये पूर्ण झाल्याचा एक शिलालेख होता. तो सध्या रस्त्याच्या खाली गेला आहे. साधारणपणे प्रत्येक २० ते २५ वर्षांनंतर मंदिराचा जीर्णोद्धार होत गेल्याच्या खुणा आपल्याला पाहायला मिळतात. गावातील सर्व लहानथोर ग्रामस्थांनी आपापल्या परीने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी श्रमदान, धनदान इत्यादी माध्यमातून भरीव मदत केली आहे.
गावातील महादेव तालीम मंडळ व हनुमान तालीम मंडळ यांनी गावचे नाव कुस्ती, दांडपट्टा, झांजपथक, लेझीम पथक इत्यादी क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. त्यामुळे करवीर तालुक्यातच नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्यात दोनवडे एक आदर्श गाव म्हणून वाखाणले जाते. दरवर्षी दोन्ही तालीम मंडळांकडून महाप्रसाद वाटप केले जाते. गावात ३० ते ३५ वर्षे अखंडित ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसाद सुरू आहे.
गावातील विविध संस्था गावातील नागरिकांनी, माजी सरपंचांनी आपापल्या कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे चालवून नावारूपाला आणल्या आहेत. विशेष म्हणजे गावातील श्री जोतिर्लिंग मंदिर विकास समितीच्या माध्यमातून २००० पासून मंदिरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला. दसऱ्याला सोने लुटण्याची पूर्वीची बंद पडलेली पद्धत, गावचा उरुस सुरू करण्याचे पूर्ण श्रेय या समितीला आहे. पूर्वीच्या पद्धती सुरू करून या विकास समितीने गावाचा एकोपा अबाधित ठेवून तसेच कामाचा वारसा गेली अनेक वर्षे अखंडितपणे जपला आहे.
गावाचे वैशिष्ट्य असे की, गावची लोकसंख्या कमी आहे; पण एकूण कार्य मोठे आहे. महिन्यात श्रावण गावातील दोन्ही तालमींकडून गेली कित्येक वर्षे महाप्रसाद वाटपाचे काम अखंडितपणे सुरू आहे. तसेच स्वामी समर्थ मंडळाकडून गेली अनेक वर्षे दत्त जयंतीला महाप्रसादाचे वाटप सुरू आहे. खरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराशेजारी गावतळे आहे. आजमितीस या तळ्यातील पाणी केव्हाच आटलेले नाही.
जोतिर्लिंग यात्रा कमिटीने मंदिराच्या रंगरंगोटीचे काम लोकवर्गणीतून पूर्ण केले आहे. आरतीचे मानकरी पाटील भावकी, मगदूम भावकी, चौगले भावकी पालखीचे मानकरी असतात, बारा बलुतेदार पालकीचे मानकरी असतात.

चौकट
कुस्तीच्या पंढरीत आज मैदान
हनुमान तालीम आणि महादेव तालमीच्या माध्यमातून पूर्वीपासून दानपट्टा व मर्दानी खेळ खेळण्यात दोनवडे गाव नावलौकिकला आले आहे. यामध्ये महादेव कळके, हरी पाटील, पांडुरंग कदम, बंडा चौगले यांनी जिल्ह्यात, राज्यभरात प्रथम क्रमांक पटकावला होता. कुस्तीची सुरुवात होऊन यात कृष्णात खोंद्रे, शिवाजी पोवाळकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती केली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये रंजित महाडिक, अतुल पाटील, शिवाजी पोवाळकर, शहाजी पोवाळकर चमकले आहेत. संभाजी विठ्ठल पाटील, महादेव तुकाराम पाटील, बाजीराव पाटील, शिवाजी खोंद्रे, कै. नंदू कांबळे, कृष्णा सातपुते, शहाजी शिंदे, नीलेश खोंद्रे, दीपक पाटील, ज्योतीराम चौगले, निखिल पाटील, गणेश कदम, अशोक पोवाळकर, रवींद्र रायकर, मोहन पोवाळकर, सुनील कदम, नवनाथ कदम, तसेच निवेदक म्हणून राज्यभरात यशवंत पाटील याच्या नावाची ख्याती आहे. आज यात्रेनिमित्त निकाली कुस्तीचे मैदान होत आहे. तसेच तरुणांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
------------------
पुरवणी संकलन
-कुंडलिक पाटील, दोनवडे.

Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b01890 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top