साडेचारशे हेक्टर क्षेत्रावर पेरणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farming
रब्बी हंगामातील साडेचारशे हेक्टर क्षेत्रावर पेरणी

साडेचारशे हेक्टर क्षेत्रावर पेरणी

कुडित्रे : यंदा रब्बी हंगाम एक महिना लांबणीवर पडला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील साडेचारशे हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उशीर झाल्यामुळे गव्हाचा हंगाम हातचा जाण्याची शक्यता आहे. दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे माळ रानावर भात कापणीला वेग आला आहे, तर रब्बी हंगामातील ज्वारी टाकण्यात शेतकरी मग्न आहे. जिल्ह्यात यंत्र सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्र रब्बीचे आहे. यामध्ये ज्वारी सुमारे ११ हजार हेक्टर, गहू ३५०० हेक्टर, हरभरा ५५०० हेक्टर क्षेत्र आहे. ऑक्टोबर महिन्यात २५ मंडळात सुमारे ६५ मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे ऑक्टोबरपासून सुरू होणारा रब्बी हंगाम सुमारे एक महिना उशीर झाला आहे.
सुरुवातीला काही पेरणी केलेले क्षेत्र वाया गेले तसेच ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे सध्या सुरू आहेत.

करवीर, पन्हाळा तालुक्यात माळरानावर, कोरडवाहू डोंगरी शेतात जमिनीवर दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे भात कापणीला वेग आला आहे व भात कापलेल्या ठिकाणी नांगरट करून ज्वारी टाकली जात आहे. काळ्या जमिनीत अद्याप पाणी असल्याने काही ठिकाणी भाताची कापणी व रब्बी हंगाम पुढे जात आहे. जिल्ह्यात ऊस तोडणी हंगाम सुरू होत आहे. यामुळे खोडवा पिकात आंतरपीक गहू हरभरा घेतला जाईल, असे चित्र आहे. सुमारे एक महिना हंगाम पुढे गेल्यामुळे गहू पीक करण्यावर मर्यादा येणार आहेत.
निचरा होणाऱ्या जमिनीत हातकणंगले, कागल, गडहिंग्लज तालुक्यात सुमारे ४५० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. तसेच या हंगामासाठी जिल्ह्यात सुमारे ४९ हजार टन खताची उपलब्धता असून वीस हजार टन युरिया उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी
प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पैसे आले आहेत. रब्बी हंगामाच्या तोंडावर सर्व शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध व्हावे, अशी मागणी होत आहे.

रब्बी हंगामासाठी बियाणे खते उपलब्ध आहेत. पावसाने उघडीप दिल्यामुळे वापसा येईल. वापसा आल्यानंतर रब्बीची पेरणी करावी. २५ मंडळात ६५ मिलिमीटर पाऊस पडला. पिकाचे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
- रवींद्र पाटक, कृषी उपसंचालक