
पर्यावरणासाठी मला पुन्हा जगू द्या
02995
दोनवडे : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वडाला फुटलेली पालवी.
पर्यावरणासाठी मला पुन्हा जगू द्या...
दोनवडेतील १०० वर्षांच्या वडाच्या झाडाला पुन्हा पालवी
कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. १४ : १०० वर्षे वयोमर्यादा झालेले वडाचे झाड पावसात उन्मळून पडले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नॅशनल हायवे खात्याच्या वतीने झाड तोडले होते. मात्र तोडलेल्या झाडाचा बुंधा पडलेल्या स्थितीत होता. त्याला पालवी फुटली आहे. या वडाच्या झाडाचे पुनर्रोपण करणे गरजेचे आहे. पर्यावरणासाठी मला पुन्हा जगू द्या... अशी आर्त हाक वडाचे झाड देत आहे.
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरण सुरू झाले आहे. रुंदीकरणावेळी दोनवडेत एक वडाचे झाड व बालिंगा ते फुलेवाडीदरम्यान वडाची सहा झाडे तोडावी लागतात. ती झाडे तोडण्यासाठी झाडांना मार्किंगही झाले आहे. दरम्यान गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात दोनवडेत वडाचे झाड उन्मळून पडले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नॅशनल हायवे खात्यातर्फे झाड बाजूला हटवले. मात्र झाडाचा बुंधा पडलेल्या स्थितीतच ठेवला आहे. या झाडाच्या बुंध्याला पालवी फुटली आहे. या झाडाचे पुनर्रोपण करावे, करावे अशी मागणी होत आहे.
निसर्गमित्र संस्थेने कोल्हापूर ते गगनबावडा रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या वृक्षसंपदेची पाहणी केली, यामध्ये महत्त्वाचे औषधी व आणि दुर्मिळ वृक्ष आढळले आहेत. याचे संवर्धन होणे भविष्यकाळात गरजेचे आहे. नव्याने शासकीय व खासगी रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून रस्त्याच्या दुतर्फा याच जातीच्या वृक्षांचे रोपण होणे गरजेचे आहे. यामध्ये कुंकूफळ, काळाकुडा, भोकर, काटेसावर, अर्जुन, चिरफळ, उक्षी, कुंभा, पपनस, हिरडा, बेहडा, कटकी, कदंब, कळंब, शिवन, सातवीन, पायर, ऐन, किंजळ, भरलेमाड, नाना, बसावा, वड, पिंपळ, जांभूळ झाडांचा समावेश आहे.
कोट
विनाकारण शंभर वर्षांच्या झाडांना मारू नका. वडाच्या झाडांचे पुनर्रोपण करावे. संबंधित खात्याला नाही जमलं तर त्यांनी झाडे तोडू नयेत. आम्हाला कळवावे, आम्ही झाडांचे पुनर्रोपण करू.
- सयाजी शिंदे, अभिनेते
वडाच्या झाडांचे पुनर्रोपण करावे. रुंदीकरणाच्या ठिकाणी वृक्षारोपण करावे. तसेच विविध जातीच्या झाडांच्या बियांपासून वनीकरण व प्लांटेशन करण्यास प्राधान्य द्यावे. - अनिल चौगले, निसर्गमित्र संस्था