पाणंद रस्ता योजना हिताची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणंद रस्ता योजना हिताची
पाणंद रस्ता योजना हिताची

पाणंद रस्ता योजना हिताची

sakal_logo
By

प्रगतिशील शेतीचा रस्ता- भाग ३


पाणंद रस्ता योजना हिताची
---
राज्य, केंद्राकडून निधी; शेतमाल बाजारात पोचविण्यासाठी होतोय लाभ
कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. २४ : कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे. शेतमाल बाजारात पोचविण्यासाठी तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज आहे. असे शेतरस्ते हे रस्ते योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्रोतांमधून निधीच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत होत्या. यावर मात करून शेतकऱ्यांना शेतात वाहतुकीयोग्य रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी शासनाने विविध योजनांच्या अभिसरणामधून शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. यात केंद्र व राज्याकडून निधी दिला जातो. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे.
यांत्रिकीकरणामुळे शेतीत पेरणी आंतर मशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत होतात. अशा यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पावसाळ्यातही पाणंद रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातून राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ नुसार या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केला. तसेच, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णयान्वये ग्रामीण भागातील रस्त्यांची वर्गवारी केली आहे.
ग्रामीण रस्ते व हद्दीचे ग्रामीण रस्ते गावनकाशात दोन भरीव रेषांनी दाखविले आहेत. या रस्त्यांची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकात समाविष्ट केलेली नाही. ग्रामीण गाडी मार्ग गावनकाशात तुटक दुबार रेषेने दाखविले असून, अशा रस्त्यांची नोंदणी साडेसोळा ते एकवीस फूट आहे. पायमार्ग गावनकाशात तुटक एका रेषेने दाखविले असल्यास अशा रस्त्यांची रुंदी सव्वाआठ फूट आहे. शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग हे रस्ते नकाशावर दाखविले नाहीत. परंतु, वाद निर्माण झाल्यास अशा रस्त्यांबाबत निर्णय देण्याचे अधिकार कलम १४३ नुसार तहसीलदारांना दिलेले आहेत.
वित्त आयोग, खासदार-आमदार निधी, स्थानिक विकास निधी, ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी मिळणारे अनुदान, मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान, गौण खनिज विकास निधी, ग्रामपंचायतीला मिळणारे महसुली अनुदान, जिल्हा परिषद-पंचायत समिती सेसमधून उपलब्ध होणारा निधी, ग्रामपंचायतीचे उत्पन्न आदींमधून निधी उपलब्ध करावा लागेल. राज्यभरात गावागावांत शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. यात केंद्र व राज्याकडून निधी मिळतो. या योजनेनुसार राज्यात दोन लाख किमीचे रस्ते प्रस्तावित होते. शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावेत, या दृष्टिकोनातून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ ही संकल्पना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (मनरेगा) व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबवावी लागणार आहे.
----------------------
चौकट
दोनवडे पोटरस्त्यांचे गाव...
करवीर तालुक्यातील दोनवडे येथे सहा मुख्य शेतशिवार रस्त्यांना नदीकाठापर्यंत प्रत्येकी किमान दहा पोटरस्ते आहेत. पोटरस्त्यांचे जाळे असल्याने वाहतुकीची कोणतीही कोंडी होत नाही. जिल्ह्यात नव्हे, राज्यात पोटरस्त्यांचे गाव म्हणावे लागेल.
(समाप्त)