
प्रश्न कोल्हापूर गगनबावडा रस्ता रुंदीकरणाचा
लोगो : प्रश्न कोल्हापूर गगनबावडा रस्ता रुंदीकरणाचा
03273, 03271
दोनवडे : रुंदीकरणात पुराच्या ठिकाणी मोऱ्या कराव्या यासाठी मागणी केल्यानंतर ड्रोनच्या साह्याने सर्वे करताना कर्मचारी.
दोनवडे, बालिंग्यात ड्रोनद्वारे सर्वे
जादा मोऱ्यांचे नियोजन; माहिती देण्यास टाळाटाळ
कुडित्रे, ता. १ ः कोल्हापूर- गगनबावडा रस्ता रुंदीकरण सुरू आहे. रस्त्याची समपातळी करण्यासाठी दोनवडे, बालिंगादरम्यान दोन मीटरने उंची वाढणार आहे. यामुळे पुराच्या भीतीखाली नागरिक आहेत. याबाबतची मालिका दै. ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर आज संबंधित खात्याकडून ड्रोनच्या साह्याने रस्त्याचा सर्वे केला. दरम्यान सर्वेबाबत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
भोगावती नदीला महापूर आल्यानंतर अनेक गावात घरे व पिकांना फटका बसतो. आता रस्त्याच्या उंचीमुळे व भरावामुळे करवीर तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसेल. यामुळे दोनवडेच्या बाजूला चार, बालिंगाच्या बाजूला दोन मोठ्या मोऱ्या कराव्यात, अशी मागणी सरपंच व शेतकऱ्यांनी केली होती. ‘सकाळ’मधून मालिका प्रसिद्ध होताच सर्व गावांतील सरपंच एकवटले आणि मागण्यांचा लढा उभारला गेला. आज रस्त्याच्या एका बाजूला बांबू मारून ड्रोनच्या साह्याने कर्मचाऱ्यांनी सर्वे केला. एक ड्रोन खराब झाल्यानंतर दुपारी पुन्हा दुसरा ड्रोन आणून रस्त्याचा मोऱ्या करायच्या ठिकाणी सर्वे केला.
याबाबत राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, राजेंद्र सूर्यवंशी, शेतकरी तानाजी मोरे म्हणाले, ‘दोन दिवसांत आमदार, खासदारांबरोबर बैठकीचे नियोजन करणार असून संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन पुढची आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.’
कोट
आज ड्रोनच्या साह्याने सर्वे केला. एकूण चार मोऱ्या कराव्यात, अशी मागणी आहे. अन्यथा पुराच्या पाण्याचा फटका गावांना बसेल, अशी स्थिती आहे.
- वसंत पाटील दोनवडे, शेतकरी,