करवीर पंचायत समितीतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवीर पंचायत समितीतच 
पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न
करवीर पंचायत समितीतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न

करवीर पंचायत समितीतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न

sakal_logo
By

03302, 03303
कुडित्रे : करवीर पंचायत समितीमधील गंजलेली बंद स्थितीतील पाणी शुद्धीकरण यंत्रणा. दुसऱ्या छायाचित्रात समितीत येणाऱ्यांसाठी उपलब्ध गढूळ पाणी.


करवीर पंचायत समितीत
पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न
अशुद्ध पाणी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न
कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. १३ : करवीर पंचायत समितीतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथील पाणी शुद्धीकरण यंत्रणा गंजली असून मोडून पडली आहे. नळाला गाळयुक्त तांबडे पाणी येत आहे. हेच पाणी तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना प्यावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथे तातडीने स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
करवीर पंचायत समितीवर सध्या गटविकास अधिकारी हे प्रशासक आहेत. तालुक्यातील हजारो नागरिक विविध विभागांत कामासाठी येतात. त्यांना या ठिकाणी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली जात होती. दरम्यान, गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर असलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोडून पडली आहे. नळाला गाळयुक्त तांबडे पाणी येते, एका पिपात हे पाणी भरून ठेवले जाते. उन्हाळ्याचे दिवस आहेत. ग्रामीण भागातून नागरिक रंकाळा स्टॅन्ड येथे येतात. त्यानंतर, चालत पंचायत समिती या ठिकाणी आल्यानंतर प्रथम पिण्याच्या पाण्याची शोधाशोध होते. अशा वेळी नागरिकांना हेच तांबडे पाणी प्यावे लागते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
पंचायत समितीच्या विविध विभागांत किमान २०० कर्मचारी काम करतात. हे सर्व कर्मचारी घरातून पिण्याचे पाणी घेऊन येतात. विविध विभागांच्या सभागृहात मीटिंग होतात. तालुक्यात ११८ गावात, किमान ५० ग्रामसेवक दिवसातून पंचायत समितीला कामानिमित्त येतात, सरपंच येतात. यांना पिण्याच्या पाण्याची बॉटल विकत घ्यावी लागते. ग्रामीण भागातील नागरिक पंचायत समितीला आल्यानंतर, असे गढूळ पाणी पितात. यामुळे येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.
-------------------
कोट
दररोज हजारो नागरिक कामानिमित्त पंचायत समितीत येतात. शुद्ध पाण्याची व्यवस्था बंद पडली आहे. येथे पिंपात गढूळ पाणी असते. हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. सदस्य, माजी पदाधिकारी कामानिमित्त पंचायत समितीला येतात, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली जात नाही.
- प्रदीप झांबरे, माजी सभापती
------------------
कोट
शुद्ध पाण्याची यंत्रणा बंद पडली आहे. ‘सेस’फंडातून नवीन घेण्याचे नियोजन असून लवकरच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ.
- आर. एस. जाधव, सहायक गटविकास अधिकारी