
अतिक्रमण धारकांची लूट
03563, 03562
कोल्हापूरः करवीर तहसीलदार कार्यालयाबाहेर कागदपत्रे काढण्यासाठी झालेली गर्दी व पैसे देताना अतिक्रमणधारक
....
करवीर तहसीलमध्ये अतिक्रमणधारकांची लूट
नकला देण्यासाठी ६० रुपये विनापावती फी
कुडित्रे, ता.२२ः करवीर तालुक्यातील गायरान जमिनीवरील सुमारे ५१०० अतिक्रमणधारकांना करवीर तहसीलदार यांच्या आदेशाने एप्रिलअखेर नोटीसा बजावल्या आहेत. एक महिन्यात कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली आहे. यामुळे गावागावात अतिक्रमणधारक पुरावे कागदपत्रे गोळा करण्यासाठी धडपडत असताना, करवीर तहसीलदार कार्यालयात या अतिक्रमणधारकांची लूट सुरू आहे. उतारा, नकला देण्यासाठी ६० रुपये फी घेतली जात असून कोणतीही जमा पावती दिली जात नसल्याचे चित्र आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत जनहित याचिका दाखल झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर २०२२ रोजी राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत एका वर्षाअखेर काढण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार शासकीय जमीन, गायरान जमीन, निवासी, वाणिज्य, औद्योगिक, शेती अन्य कारणासाठी अनधिकृतपणे अतिक्रमण केले आहे, त्यांना २२ ऑगस्ट २०२२ रोजी एक नोटीस बजावली होती. पुन्हा एप्रिलअखेर ५१०० अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली आहे.
कागदपत्रे देण्याची या महिन्याची अखेरची तारीख असल्याने ग्रामपंचायतमध्ये घरफाळा पावती व तहसीलदार कार्यालयात एक ई चा उतारा काढण्यासाठी अतिक्रमणधारकांची धांदल उडाली आहे. मात्र करवीर तहसीलदार कार्यालयात नकलेची प्रत देताना ६० रुपये घेतले जातात व कोणतीही पावती दिली जात नाही.
नाव न घालण्याच्या अटीवर एक अतिक्रमणधारक म्हणाला,‘ कागदपत्रे काढताना आमची दमछाक झाली आहे. तहसीलदार कार्यालयात एक ई चा उतारा काढण्यासाठी साठ रुपये घेतले जातात.’ दरम्यान, ही दुप्पट लूट थांबणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका नकलेला ३० रुपये जादा घेतले, तर हजार नकलांचे सुमारे ३० हजार रुपये होतात.
...
कोट
‘कर्मचाऱ्यांनी नियमाप्रमाणे फी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत. कार्यालयात जादा पैसे घेत असतील तर नागरिकांनी तक्रार करावी, संबंधितांवर तत्काळ कारवाई करू.
स्वप्नील रावडे, तहसीलदार, करवीर