
कागल : समरजितसिंह घाटगे प्रसिध्दी पत्रक
शिंदे, फडणवीस यांच्या कार्यतत्परतेमुळेच
ओबीसी समाजास न्याय ः समरजितसिंह घाटगे
कागल, ता. २० : सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीमुळे रद्द झालेले हे आरक्षण अवघ्या काही दिवसांपूर्वी सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यतत्परतेमुळे पुन्हा मिळाले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व राज्य सरकारचे अभिनंदन करीत असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी कायदेशीर लढा दिला होता. मात्र, यात त्यांना यश आले नव्हते. परंतु, शिंदे-फडणवीस सरकार येताच अवघ्या काही दिवसांतच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखविला आहे. राज्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांना स्थगिती मिळाली होती. या निर्णयामुळे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या दोन आठवड्यांत निवडणुकीचा नवा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. गेल्या अडीच वर्षांत ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत वेळकाढूपणा केला होता. हे आरक्षण मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी समाज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02350 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..