
कागल : एटीएम बदल करून तीस हजार लांबविले
कार्डाची आदलाबदल
करून हडपले ३० हजार
कागलमधील प्रकार; अनोळखीची हातचलाखी
कागल, ता. ३ : येथील एका तरुणीकडील एटीम कार्डची आदलाबदल करत एका अनोळखी व्यक्तीने तीस हजार रुपयांना गंडा घातला. एटीएममधून दुसऱ्यांदा पैसे काढत असताना पिन नंबर चुकीचा असल्याचे निदर्शनास आल्याने एटीएम कार्डची चोरी झाल्याचे संबंधित तरुणीच्या लक्षात आले. बँकेतील खाते ब्लॉक करेपर्यंत ही रक्कम उपनगरातील
दुसऱ्या एटीएममधून काढल्याचे समोर आले. विराज सिटी परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये आज दुपारी ही घटना घडली.
उपनगरात राहणाऱ्या एका निवृत्त शिक्षकांच्या पेन्शनची रक्कम काढण्यासाठी त्यांची मुलगी येथील विराज सिटीमध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गेली होती. एटीएममधून १५ हजार रुपये एकाच वेळी काढता येत नाहीत. त्यामुळे संबंधित तरुणीने एटीएम मशिनमधून पहिल्यांदा पाच हजार रुपये काढले. यावेळी तिच्या मागे उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तिच्या एटीएम कार्डचा पिन नंबर चोरून पाहिला. दुसऱ्यांदा ही तरुणी एटीएममधून पैसे काढत असताना मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने तिला शेजारीच असलेल्या दुसऱ्या एटीएम मशिनमधून पैसे काढण्यास सांगितले. यावेळेत त्या व्यक्तीने बोलण्यात गुंतवत संबंधित तरुणीकडील एटीएम कार्डची अदलाबदल केली. बदल झालेल्या एटीएम कार्डाने दहा हजार रुपये काढताना एटीएम कार्डचा पिन नंबर चुकीचा असल्याचा संदेश एटीएम मशिनवर आला. त्यामुळे एटीएम कार्ड पाहिले असता ते दुसऱ्याचे असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणीने कार्डची चोरी केलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो नजरेस पडला नाही. त्यामुळे तरुणीने स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन एटीएम चोरीला गेल्याचे सांगत खाते ब्लॉक करण्याची विनंती केली. यावेळी बँकेचे नियम आडवे आल्याने खाते ब्लॉक करण्यासाठी बराचसा कालावधी गेला. या काळात संबंधित युवतीकडील एटीएमच्या सहाय्याने अनोळखी व्यक्तीने येथील विजय आर्केडमधील एका एटीएम मशिनमधून तीस हजार रुपये काढल्याचे समोर आले. याबाबत संबंधित तरुणीने कागल पोलिस ठाण्यात एटीएम चोरीला गेल्याची तक्रार दिली. तसेच स्टेट बँकेच्या एटीएम मधील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळण्याची विनंती केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kgl22b02390 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..