उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य देणार
उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य देणार

उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य देणार

sakal_logo
By

04224
कागल : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४३ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ गव्हाणीमध्ये ऊस मोळी टाकून करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण.

उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य देणार
समरजितसिंह घाटगे; शाहू कारखान्याचा गळीत हंगाम सुरू
कागल, ता. १७ : साखर उद्योगासमोरील अडचणी पाहता भविष्यात साखर कारखान्यांना केवळ साखरेच्या उत्पादनावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी भविष्याचा वेध घेत उपपदार्थ निर्मितीकडे वळावे लागेल. म्हणूनच शाहू साखर कारखाना उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य देणार आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४३ व्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
घाटगे म्हणाले, ‘‘एकूण देशातील साखरेचे उत्पादन पाहता साखर विक्रीच्या दरवाढीला मर्यादा आहेत. सहवीज निर्मिती प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या विजेचा खरेदी दर दोन रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे उसापासून इथेनॉल, बायोसीएनजी, पोटॕश व इतर उपपदार्थ निर्मितीला शाहूने प्राधान्य दिले आहे. कारखाना प्रशासनासमोर अवकाळी पावसाचे संकट आहे. व्यवस्थापन व प्रशासन हंगाम सुरू करण्यास सज्ज आहे. एक-दोन दिवस अंदाज घेत नियमित गळीत हंगामास सुरुवात करीत आहोत. शाहू साखर कारखान्याने या गळीत हंगामामध्ये ११ लाख टन गळीताचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी शंभर टक्के ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे.’’ उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. संचालक सचिन मगदूम यांनी आभार मानले.
------------
चौकट
पुढच्या दहा वर्षांचे नियोजन तयार
स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्यापासून ‘शाहू’मध्ये साखर कारखानदारीत होत असलेले बदल स्वीकारण्यासह भविष्याचा वेध घेऊन नियोजन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार पुढील दहा वर्षांत साखर उद्योग, सहकारी साखर कारखानदारी यांच्यासमोर कोणती आव्हाने असतील व त्याला आपण कशा पद्धतीने सामोरे जाऊ, याच्यासह कारखान्याच्या ऊस गाळप, इथेनॉल निर्मिती व इतर नवीन उपपदार्थ निर्मितीचे पुढील दहा वर्षांचे शाहू साखर कारखान्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती घाटगे यांनी दिली.