
कागल : कर्जमंजुरी पत्रांचे कागलमध्ये वितरण...
कागल ः केडीसीसी बँकेकडून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज मंजुरीपत्रांचे वाटप करताना आमदार हसन मुश्रीफ, भैया माने, चंद्रकांत गवळी, नितीन दिंडे, मनोज फराकटे व इतर प्रमुख.
04846
...
कर्जपुरवठ्यात जिल्हा बँक अग्रस्थानी
हसन मुश्रीफ ःअण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण
कागल, ता.५ : ‘कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरूणांना कर्जपुरवठ्यामध्ये जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. हजारो युवक - युवतींना वित्तपुरवठा केला आहे’, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये जिल्हा बँकेच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज मंजुरीपत्रांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘जिल्हा बँक सर्वच प्रकारच्या उद्योग व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर आहे. मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसायाभिमुख करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अण्णासाहेब पाटील योजनेमधून प्रकरणे सुरू आहेत. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार ज्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांना आर्थिक स्थैर्य देवून व्यवसायाभिमुख करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे योगदान मोठे आहे. मराठा समाजासह इतर मागासवर्ग समाजासाठीही उद्योग, व्यवसाय व रोजगारवाढीच्या दृष्टीने तरुणांनी केडीसीसी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, ‘तीन वर्षांपूर्वी सकल मराठा समाजाच्यावतीने वसंतराव मुळीक, संजय पवार व समाजाचे पदाधिकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांना भेटले. त्यांनी सांगितल्यानंतर बँकेने ताबडतोब हे काम सुरू केले. बँकेकडे मागणी केलेल्या सर्व पात्र हजारो तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे काम बँकेने केले आहे. बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत मराठा समाजाच्या १,२७८ युवक- युवतींना रोजगार, उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी ११९ कोटी कर्ज दिले आहेत.’
यावेळी नगरसेवक चंद्रकांत गवळी, नितीन दिंडे, सुनील कदम, संजय ठाणेकर, संग्राम लाड, मनोजभाऊ फराकटे, रमेश तोडकर, महेश चौगुले, नारायण पाटील, बी. एम. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.