दिवसभर थांबून तीनच भाडी!

दिवसभर थांबून तीनच भाडी!

04856
कागल : ग्राहकांच्या प्रतीक्षेतील बसस्थानक चौकातील रिक्षाचालक.


दिवसभर थांबून तीनच भाडी!
कागलला रिक्षाचालक अगतिक; दुचाकी, स्कूल बस वाढल्याचा परिणाम
कागल, ता. १४ : घराघरांत वाढलेली दुचाकी वाहने, महिलांकडे आलेल्या मोपेड व विद्यार्थी वाहतुकीसाठी शाळांनी घेतलेल्या स्कूल बसेसचा परिणाम येथील रिक्षा व्यवसायावर झाला आहे. पूर्वी दिवसभरात १०-१२ भाडी होत असताना सध्या मात्र तीन ते चार भाडी होत असल्याने व्यवसाय परवडत नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. कागल शहराअंतर्गत वाहतुकीसाठी ४० हून अधिक रिक्षा कार्यरत होत्या. ४२ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात आता केवळ २४ रिक्षाचालक आहेत.
१९८० साली येथील माजी उपनगराध्यक्ष भिकाजी रेळेकर यांनी कागल शहरात पहिली रिक्षा आणली. ही वैयक्तिक कामासाठी आणलेली रिक्षा असली तरी ते रुग्णांच्या वाहतुकीसाठी तसेच गावसेवेसाठी ही रिक्षा मोफत देत होते. त्यानंतर १९८५ साली आनंदराव पाटील यांनी रिक्षा आणली. गेस्टॅपो असे नाव त्यांनी रिक्षावर लिहिले होते. आजही त्यांना त्याच नावाने ओळखतात. त्या काळी नागरिकांच्या वाहतुकीसह जनजागृतीसाठी रिक्षावर स्पीकर लावून फिरवण्यासाठी रिक्षाचा जास्त वापर केला गेला. त्यानंतर १९८७ साली रफिक सय्यद यांनी विद्यार्थी वाहतुकीसाठी रिक्षा आणली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कागल शहरात ऑटोरिक्षा आणल्या गेल्या. १९९५ ते २००५ हा या रिक्षाचा भरभराटीचा काळ होता. या काळात तब्बल ४० हून अधिक रिक्षा कागल शहरातील अंतर्गत दळणवळणीसाठी होत्या. आज कागल शहरात केवळ २४ ऑटोरिक्षा सुरू आहेत. यांपैकी बसस्थानक स्टॉपवर १४, खर्डेकर चौक स्टॉपवर ८ व गैबी चौक स्टॉपवर दोन अशा २४ रिक्षा कार्यरत आहेत.
पूर्वी दिवसभरात दहाहून अधिक फेऱ्या भाडे मिळत होते. आज केवळ चार ते पाच भाडे फेऱ्या मिळतात. पूर्वी जत्रेला किंवा माहेरवाशिणींची ने-आण करण्यासाठी रिक्षा भाड्याने घेतल्या जात असत. विद्यार्थी वाहतुकीसाठीदेखील रिक्षांचीच सोय होती. पण कालानुरूप बदल होत गेले. रिक्षाचे अपघात कमी असूनही इन्शुरन्स जास्त व उत्पन्न कमी अशी अवस्था होऊ लागली आहे. शाळांनीही स्कूल बसची सोय केल्याने विद्यार्थी रिक्षा वाहतूकही बंद पडली. पूर्वी सोमवार आणि गुरुवार बाजाराच्या दिवशी उपनगरातील नागरिक बाजार नेण्यासाठी रिक्षाचा वापर करीत होते. पण गृहिणींच्याकडे वाहने आली. असा सर्वांचा परिणाम रिक्षा वाहतुकीवर झाला.
---------------
चौकट
सध्या रिक्षा व्यवसाय अडचणीत आहे. वयाच्या साठीनंतर हा व्यवसाय करणे कठीण आहे. रिक्षा व्यावसायिकांना पेन्शन मिळायला हवी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिक्षाचालकांच्या समस्या माहिती आहेत. त्यांनी रिक्षा व्यावसायिकांना पेन्शन सुरू करावी.
- आनंदराव पाटील, रिक्षा व्यावसायिक, कागल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com