
कागल : लम्पी - सव्वाशे शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
‘कागल’ला लम्पीच्या भरपाईची
सव्वाशे शेतकऱ्यांना प्रतीक्षा
कागल, ता. ७ : शेतकऱ्यांसाठी पशुधन जोडधंदा म्हणून गणला जातो. हजारो रुपये उपचारावर खर्च करूनही लाखमोलाचे पशुधन लम्पी संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू पावले. लम्पीच्या संसर्गाने कागल तालुक्यात २३४ जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यातील १०९ जणांना नुकसानभरपाई मिळाली आहे. उर्वरित सव्वाशे शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
कागल तालुक्यात एकूण ४२ हजार ०३५ गोवंशीय जनावरांपैकी २ हजार ४७५ जनावरांना लम्पीची लागण झाली. त्यातील २३४ जनावरे दगावली. २ हजार २४१ जनावरे बरी झाली. तर तालुक्यातील ४४ हजार जनावरांचे लसीकरण सप्टेंबर महिन्यातच पूर्ण केले आहे. तालुक्यातील बहुतांश गावांत या साथीची लागण झाली होती. या संसर्गजन्य त्वचेच्या आजाराची जनावरांना लागण झाली होती, तर उपचारानंतर जनावर बरी झाली आहेत.
लम्पी आजारामुळे पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली. त्यानुसार काहींना ही नुकसानभरपाई मिळाली. पण अद्याप अनेक पशुपालक शेतकरी वंचित आहेत. मृत झालेल्या जनावरांची भरपाई द्या, अशी आर्त हाक पशुपालक शेतकरी देत आहेत.
----------
कोट
लम्पी आजाराच्या काळात तालुक्यातील २३४ मृत्यू झालेल्या जनावरांचा सर्व्हे करून पशुवैद्यकीय खात्याकडे पाठवला आहे. त्यापैकी १०९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. अद्याप १२५ अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. टप्प्याटप्प्याने अर्ज मंजूर होऊन भरपाई दिली जाणार आहे.
- डॉ. दीपक घनवट, तालुका पशुधन विकास अधिकारी