
कागल : अपघात एक ठार
05109
....
टेंपो ट्रॅव्हल्सच्या धडकेत
मोटारसायकलस्वार ठार
कागल - निढोरी मार्गावर भीषण अपघात
कागल, ता. १७ : कागल - निढोरी मार्गावर शाहू साखर कारखान्याच्या फाट्यावर मिनी टेंपो ट्रॅव्हल्स आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात पांडुरंग सात्ताप्पा तोरस्कर (वय ५५, नागाव, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला. अपघातात तोरस्कर यांना टेंपो ट्रॅव्हल्सने तोरस्कर यांना सुमारे शंभर ते दीडशे फूट फरपटत नेले. मंगळवारी (ता.१६) रात्री ही दुर्घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, पांडुरंग तोरस्कर हे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होते. डाव्या कालव्यावरील काम आटोपून मंगळवारी रात्री ते मोटारसायकलने नागावला घरी परत चालले होते. याचवेळी बिद्रीतील गोकुळच्या कर्मचाऱ्यांना घेऊन टेंपो ट्रॅव्हल्स कागलमार्गे गोकुळ शिरगांवकडे जात होती. वेगात असलेल्या टेंपो ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या तोरस्कर यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. या धडकेत तोरस्कर यांचा डावा पाय तुटला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी कागल पोलिसांनी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केली. तोरस्कर यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. टेंपो ट्रॅव्हल्समधून गोकुळचे नऊ ते दहा कर्मचारी प्रवास करत होते. अपघातात टेंपो ट्रॅव्हल्स आणि मोटारसायकलीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघाताची नोंद कागल पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.