
कागल : पाणी टंचाई आमदार हसन मुश्रीफ यांचा आरोप
पाणी टंचाईचे संकट अधिकारीनिर्मित असेल
आमदार हसन मुश्रीफ यांचा आरोप
कागल, ता. ३ : ‘काळम्मावाडी धरणातील गळती काढण्यासाठी कोणतीही तरतूद नसताना सहा टीएमसी पाणी सोडले. आंबेओहळ प्रकल्पातील पाणी चिरीमिरी घेऊन कर्नाटकात सोडल्याचा आपल्याला संशय आहे. राधानागरी धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याने पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून लांबला तर उपलब्ध पाणी पिण्यासाठी आरक्षित करावे लागेल. ही पाणी टंचाई आली तर ती मानव आणि अधिकारीनिर्मित असेल, असा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील उपस्थित होते.
काळम्मावाडी आणि राधानगरी धरणातील कमी झालेला पाणीसाठा, आंबेओहळ प्रकल्पातून सोडलेले पाणी आणि हवामान खात्याने पावसाबद्दल वर्तविलेले भाकित या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत बोलताना मुश्रीफ यांनी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले.
मुश्रीफ म्हणाले, ‘काळम्मावाडी धरणातील गळती काढण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी घेतली नाही. कामाचे ईस्टीमेट नाही की टेंडर नाही. तसेच कोणतीही आर्थिक तरतूद नसताना गळतीच्या कामासाठी धरणातून सहा टीएमसी पाणी सोडण्याची घाई अधिकाऱ्यांनी का केली? मान्सून लांबला तर ऑगस्टपर्यंत सोडलेले पाणी वापरता आले असते. मात्र आता राहिलेले पाणी पिण्यासाठी आरक्षित करावे लागेल. त्यामुळे जीवापाड जपलेले उसाचे पिक वाळण्याची भिती आहे. कागल नगरपालिका प्रशासनाने डाव्या कालव्याचे पाणी जयसिंगराव तलावात सोडण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. तसेच नैसर्गिक स्त्रोतातील पाणी तलावात जाईल याची सोय केलेली नाही. त्यामुळे शहरातील नागरीकांना पहिल्यांदाच पाणी टंचाईचा सामान करावा लागण्याची शक्यता आहे. याला पालिका प्रशासन जबाबदार आहे.’
प्रविणसिंह पाटील म्हणाले, ‘मुरगूडच्या सर पिराजीराव घाटगे तलावातील पाण्याचा शेतीकरिता केला जाणारा वापर थांबविण्यात यावा. अन्यथा तलाव मालकाच्या घरावर मोर्चा काढू.’ यावेळी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील उपस्थित होते.