
कोल्हापूर..राज्य सरकारी - निमसरकारी शिक्षक , कर्मचारी संघटना समन्वय समितीचा १४ मार्च पासून बेमुदत संप..
जुन्या पेन्शनसाठी
मंगळवारपासून बेमुदत संप
सरकारी-निमसरकारी कर्मचारी संघटनेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. १० ः जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी शासकीय, निमशासकीय, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, महापालिका (इंटक), जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या वतीने मंगळवार (ता.१४) पासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून एक नोव्हेंबर २००५ पासूनच्या सर्वच कर्मचारी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, अशी प्रमुख मागणी असल्याचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, शिक्षक भारती पुणे विभागाचे अध्यक्ष दादा लाड, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष वसंत डावरे यावेळी उपस्थित होते.
कंत्राटी, अंशकालीन, रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे नियमित आस्थापनेवर तत्काळ भरा, अनुकंपावरील नियुक्ती करा, चतुर्थ श्रेणी व वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, शिक्षक- शिक्षकेतर, महानगरपालिका- नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ मंजूर करा, कामगार कायद्यातील बदल केलेल्या जाचक अटी रद्द करा आदी मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे मंगळवार (ता.१४) पासून बेमुदत संप होणार असून कर्मचारी व शिक्षक सकाळी दहापासून दुपारी दोन वाजेपर्यंत टाऊन हॉल (संग्राम उद्यान) येथे व तालुक्याच्या ठिकाणी जमतील. तेथे विविध वक्त्यांची भाषणे होतील. शहरात पहिल्या दिवशी दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी रोड मार्गे बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौक, सीपीआर हॉस्पिटल चौक व पुन्हा टाऊन हॉल अशी फेरी निघणार असल्याचेही श्री. लवेकर म्हणाले. पत्रकार परिषदेला संजय क्षीरसागर, नितीन कांबळे, संदीप कांबळे, विठ्ठल वेलणकर, अंकुश रानमाळे, योगेश यादव ,रमेश भोसले, राजू आंबेकर, नंदकुमार इंगवले आदी उपस्थित होते.