
भेंडवडेत पूरग्रस्तांंचा एल्गार मोर्चा, बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात
KHO22B02011
भेंडवडे ः येथे पूरग्रस्त बचाव समितीने काढलेला मोर्चा.
खोची, ता.४ ः भेंडवडे येथे पूरग्रस्त बचाव कृती समितीच्यावतीने ग्रामपंचायतीवर एल्गार मोर्चा काढत बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्याकडून पूरग्रस्तांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले.
२००५,१९ व २१ या तिन्ही वर्षी वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे गावाचे प्रचंड नुकसान झाले. जवळपास ८० टक्के गाव विस्थापित झाले होते. महापुरामुळे नुकसान झालेल्या ५८० पूरग्रस्त कुटुंबांना गायरानात पक्की घरे बांधण्यास जागा मिळावी ही प्रमुख मागणी करीत बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी अशोक एडके, हर्षवर्धन चव्हाण, सुनील पसाले, हंबीरराव पसाले, सुनील देसाई, राजेंद्र मालगावे, दीपक वासुदेव यासह अनेकांनी आपल्या मागण्या लावून धरल्या. तसेच महापूरासाठी कारणीभूत ठरणाऱ्या बाबींचा अभ्यास करून याबाबत ठोस उपाय योजना करणे, गायरानमध्ये असणारे अतिक्रमण काढून सर्वच पूरग्रस्तांना एक ते दीड गुंठ्यापर्यंत जागा उपलब्ध करून देणे व जाचक अटी रद्द करणे. गायरानची मोजणी करून हद्दी निश्चिती करणे. या प्रमुख मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका समितीच्यावतीने घेण्यात आली आहे.
कोट -
पूरग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनास ग्रामपंचायतीचा पाठिंबा आहे.यापूर्वी शासकीय पातळीवर पूरग्रस्तांना गायरानात जागा मिळावी म्हणून पत्रव्यवहार केले आहेत.परंतु वरिष्ठ पातळीवरून कोणतीच हालचाल केली जात नाही. याबाबत सर्व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी,तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा करूया असे म्हणणे समितीसमोर मांडले आहे.
- काकासाहेब चव्हाण ,सरपंच भेंडवडे.
Web Title: Todays Latest Marathi News Kho22b02053 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..