
तीन खोल्यांमध्ये सात वर्गाचे विद्यार्थी
02133
---------
तीन खोल्यांमध्ये सात वर्गाचे विद्यार्थी
शिक्षणाचा बोजवारा; भेंडवडेतील प्राथमिक शाळेचे पत्रे बसवण्याचे काम मंदगतीने
रवींद्र पाटील : सकाळ वृत्तसेवा
खोची, ता. १०: भेंडवडे येथील प्राथमिक शाळेच्या पाच वर्गखोल्यांची पत्रे उडून तीन महिने उलटून गेले आहेत. छतावरील पत्रे बसवण्याचे काम मंद गतीने सुरू असल्यामुळे व ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे तीन वर्गखोल्यामध्ये सात वर्ग बसवले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून सात वर्गातील विद्यार्थी तीन खोल्यांमध्ये बसत असल्यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. त्यातच भेंडवडेला पूरस्थितीचा सामना करावा लागत असल्यामुळे नदीचे पाणी वाढल्यास ग्रामस्थांना शाळेमध्ये स्थलांतर करणे अडचणीचे ठरणार आहे.
येथील कुमार विद्यामंदिर जिल्हा परिषदेची १०५ वर्षांपूर्वीची शाळा आहे. एप्रिलमध्ये आलेल्या जोरदार वादळाच्या तडाख्याने नुतनीकरण केलेल्या शाळेचा छत उडून गेले होते. येथील स्थानिक प्रशासनाने पाठपुरावा केला नसल्याचे निवेदन काही नागरिकांनी दिले आहे. पावसाने शाळेचा परिसर चिखलमय झाला आहे. विद्यार्थ्यांना दाटीवाटीने तीन खोल्यांमध्ये बसवले जात असल्याने ताप, थंडीमुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. छताचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
-----------
शाळेचे पत्रे उडून गेल्यापसून जिल्हा परिषदेकडे याबाबत पाठपुरावा केला असून जिल्हा परिषदेच्या आकस्मिक विशेष फंडातून जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांच्या प्रयत्नातून साडेसहा लाख रुपये तसेच ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून पावणेतीन लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीतून काम सुरू आहे; परंतु पावसाच्या अडथळ्यामुळे काम जलद गतीने होत नाही. ठेकेदारही कामात तत्परता दाखवत नसल्याने काम संथ गतीने सुरू आहे.
-काकासाहेब चव्हाण, सरपंच, भेंडवडे
-----------
पूराच्या भितीने पालक व ग्रामस्थ भयभीत आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी जागा नसल्याने शिक्षणाची हेळसांड होत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुलांचे शिक्षण व आरोग्यही धोक्यात आले आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी.
-हर्षवर्धन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते
---------
भेंडवडे येथील प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांच्या छताचे काम सुरू आहे. एक वर्ग हॉलमध्ये बसवला जात असून आणखी एका शिल्लक वर्गात दुसरा वर्ग बसवला जात आहे. आठवीचा पट कमी असल्यामुळे सातवी व आठवीचा वर्ग एकत्रित बसवला जात आहे. परंतु त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे. दोन दिवसांमध्ये अस्ताव्यस्त पडलेले साहित्य उचलून साफसफाई केली जाईल. पावसामुळे कामामध्ये व्यत्यय येत आहे.
- तानाजी माने, मुख्याध्यापक, विद्यामंदिर भेंडवडे
Web Title: Todays Latest Marathi News Kho22b02122 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..