कोणता झेंडा हाती घेऊ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोणता झेंडा हाती घेऊ?
कोणता झेंडा हाती घेऊ?

कोणता झेंडा हाती घेऊ?

sakal_logo
By

कोणता झेंडा हाती घेऊ ?
ग्रामीण भागातील शिवसेनेते पदाधिकारी, कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत
रवींद्र पाटील : सकाळ वृत्तसेवा
खोची, ता. २४ : राज्याबरोबर, जिल्ह्याच्या राजकारणातही शिवसेनेच्या गोटामध्ये उलथापालथ होत आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातही पोहोचू लागला असून निष्ठावंत व सच्चा शिवसैनिकांना त्याचा मोठा धक्का बसला आहे. राजकारणाच्या खेळामध्ये नेमका कोणता झेंडा हाती घ्यावा, याबाबत शिवसैनिक व पदाधिकारी यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. बऱ्याच राजकीय घडामोडींना सामोरे जावे लागत असल्यामुळे न्यायालयीन लढाईत पुढे काय होणार याची प्रतीक्षा ग्रामीण भागातील निष्ठावंत शिवसैनिकांना लागून राहिली आहे. त्याचबरोबर दुभंगलेली शिवसेना पुन्हा एकत्रित यावी अशीही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे.
हातकणंगलेचे शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घालमेल सुरू आहे. ते कोणता निर्णय घेतात, याकडे मतदारसंघातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात सामील होऊन कार्यकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे. अनपेक्षितपणे खासदार माने यांनी घेतलेली भूमिका निष्ठावंत शिवसैनिकांना रुचणारी नाही, असे शिवसैनिकांकडून बोलले जात आहे. पक्ष अडचणीत असताना अशा प्रकारची वेगळी भूमिका घेणे कितपत योग्य आहे, असा सवालही शिवसैनिकांकडून केला जात आहे. ग्रामीण भागामध्ये सर्वच गावांमध्ये शिवसेनेचे मोठे प्राबल्य आहे. गावपातळीवर पक्षाच्यावतीने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जात नसल्या तरी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या उमेदवाराला मोठी ताकद या भागातून मिळत आहे. डॉ. मिणचेकर दोनवेळा विधानसभेवर तसेच कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रवीण यादव शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यामुळे या भागांमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे.
-----------
शिवसैनिकांमधून नाराजी
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांना जवळपास लाखभर मताने पराभूत करून खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघामध्ये पहिला शिवसेनेचा खासदार होण्याचा मान मिळवला आहे. त्यातच कोरोनामुळे दोन वर्षे विकासकामांना खीळ बसली होती. कोरोनाचे संकट दूर होत असतानाच राज्याच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप झाला. याचा दूरगामी परिणाम शिवसेनेच्या गोटामध्ये झाला आहे. नेत्यांच्या राजकारणाच्या खेळांमध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांमधून मात्र सुरु असलेल्या घडामोडींवर नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kho22b02131 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..