
मेंढ्या पालनास सहाय्य हवे
मेंढ्यापालनास साहाय्य हवे
मेंढपाळ, धनगर समाज मेळाव्यात शासनाकडून अपेक्षा
खोची, ता. ७ : विभागवार वेगवेगळ्या जातीचे मेंढ्यापालन करण्यासाठी धनगर बांधवांना शासनाने साहाय्य केले पाहिजे, अशी अपेक्षा मेंढपाळ, धनगर समाज मेळाव्यात व्यक्त केली. खोची येथील काशीलिंग बिरदेव मंदिराच्या प्रांगणात यशवंत क्रांती संघटनेतर्फे आयोजन केले होते.
यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे म्हणाले,‘धनगर समाजातील नेत्यांनी धनगर समाज बांधवांचा वापर फक्त आरक्षणाच्या नावावर मतदानासाठी केला. यामधून ना समाजाचा विकास झाला, ना आरक्षण मिळाले. त्यामुळे भविष्यात यशवंत क्रांती संघटना धनगर समाज आणि मेंढपाळ यांच्या विकासासाठी शासनाच्या विविध तेवीस योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’
पिंटू गावडे, दादासाहेब गावडे, महेश गावडे, सुनील शेळके, राम कोळेकर, मारुती हिरवे, मारुती गजानन आरगे, यशवंत वाकसे प्रमुख उपस्थित होते.
श्री. वाघमोडे म्हणाले, ‘शासनाकडून एका विशिष्ट जातीच्या मेंढ्यांचे संशोधन सुरू आहे, परंतु महाराष्ट्रातील विविध प्रदेशांत वेगवेगळ्या जातींच्या मेंढरांची संख्या आढळते. मेंढ्या त्या परिस्थितीला अनुरूप होऊन जगतात; वाढतात. विशिष्ट एकच जात प्रकारची मेंढी सर्वच प्रदेशात जगू शकत नाही. त्यामुळे विभागवार वेगवेगळ्या जातीचे मेंढ्यापालन करण्यासाठी धनगर बांधवांना शासनाने साहाय्य केले पाहिजे.’ सरपंच अभिजित चव्हाण, माजी सरपंच जगदीश पाटील, उदय पाटील, प्रमोद सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.
------------
शाखा कार्यकारिणी जाहीर
मेळाव्यात क्रांती संघटनेची शाखा कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी कार्यकारिणीचे अध्यक्षपदी संदीप लक्ष्मण बंडगर, उपाध्यक्षपदी महादेव दादू कोळेकर, बिरदेव सुभाष वाळकुंजे यांची शाखा संपर्कपदी निवड जाहीर करण्यात आली.