
‘जय शिवराय’तर्फे बुवाचे वठारला सभा
‘जय शिवराय’तर्फे बुवाचे वठारला जनजागृती सभा
खोची, ता. २ ः ऊसाला पाच हजार रुपये दर मिळाला पाहिजे, तसेच परिशिष्ट नऊमधील शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, या व इतर मागण्यांसाठी जय शिवराय संघटनेतर्फे बुवाचे वठार येथे जनजागृती अभियानाची सभा झाली.
जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने म्हणाले, ‘गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याने ११.४५ टक्के उताऱ्याला ३४७५ रुपये दर दिला आहे. फेब्रुवारी, मार्च व एप्रिलमध्ये तुटलेल्या ऊसाला १००, २०० व ३०० रूपये जास्त देण्याचे कारखान्याने निश्चित केलेले आहे. आपल्याकडील उतारा तेरा टक्के आहे. वरील दीड टक्याचा हिशोब करता ३०५ रुपये प्रतिटक्का दर देणे कायद्याने बंधनकारक आहे. म्हणजेच एकूण ४५७ रुपये व गुजरातने साडेअकरा टक्क्याला दिलेला ३४७५ रुपये मिळून ३९३२ रुपये दर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. याशिवाय उपपदार्थातील वाटा ७० टक्यांप्रमाणे देणेही बंधनकारक आहे. या सर्वांचा एकत्रित हिशोब करता ४७०० ते ५००० रूपयापर्यंत यावर्षीचा दर सर्वच कारखान्यांनी दिला पाहिजे. यासाठीच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या सांगली येथील ऊस परिषदेला सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे.’ रावसाहेब ऐतवडे यांनी ऊसाला ५००० रूपये, वाढीव वीज बील रद्द, सातबारा कोरा झाला पाहिजे याबाबत जनजागृती केली. उपसरपंच शंकरराव शिंदे, निवृत्ती शिंदे, सुनील चौगुले, अनिल सूर्यवंशी, भीमराव बावचे, उमेश कांबळे आदी उपस्थित होते.