
कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचा होम वहन सोहळा
डोके- श्री महालक्ष्मी अंबाबाई देवी होमवहन सोहळा विशेष...
---
फोटो- 01520
-
उत्सव झाला आनंद सोहळा
एकशे तीस वर्षाचा कालखंड पूर्ण करणाऱ्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीला कळंबे तर्फ ठाणे गावचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या देवीचा होमवहन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. वारकरी संप्रदायाची किनार लाभलेल्या कळंबा गावातील ग्रामस्थांनी जाती-धर्माचे बंद तोडून या उत्सवाला आनंद सोहळ्याचे स्वरूप दिले आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये गेले आठवडाभर या सोहळ्याला प्रारंभ झाला अनेक विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रम यानिमित्ताने संपन्न केले जात आहेत. श्री महालक्ष्मी अंबाबाई देवी भक्तगण मंडळ, कळंबा ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
-संजय दाभाडे, कळंबा
श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचा करवीर महात्म्यात कळंबेश्वरी देवी म्हणून उल्लेख आढळतो. तसेच कोल्हासुरांची पत्नी म्हणून या देवीला संबोधले जाते. या महालक्ष्मी देवीची दंतकथा सांगितली जाते. त्यामध्ये कळंबेश्वरी देवी व कोल्हासुर या पती-पत्नींने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची तपश्चर्या केल्यानंतर श्री महालक्ष्मीने प्रसन्न होऊन या पती-पत्नींना वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी कळंबेश्वरी व कोल्हासुराने करवीर(आत्ताचे कोल्हापूर) देशांचे निष्कलंक राज्य करण्यास मिळावे असा वर मागितला. तसे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीने त्यांना वरदान दिले. परंतु, कोल्हासुराच्या दोन पुत्रांनी देवदेवतांवर हल्ला करून त्यांना त्रास देण्यास सुरवात केली. त्यावेळी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईने दोन्ही पुत्रांचा वध केला. आपल्या पुत्रांचा कलह सहन न झाल्याने कोल्हासुराने श्री महालक्ष्मी देवी आणि देवदेवतांवर आक्रमण केले.या युद्धामध्ये कोल्हासुराचा वध झाला. मात्र, शिवभक्त असणाऱ्या कळंबेश्वरीचे देवता म्हणून स्थान अबाधित राहिले. तसेच या देवीला श्री महालक्ष्मी अंबाबाईचे एक रूप मानले जाऊ लागले. कोल्हापूर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत दडलेल्या कळंबे तर्फ ठाणे या गावांमध्ये छोट्या जलाशयाच्या तीरावर कळंबेश्वरी श्रीदेवीचे मंदिर आहे. जलाशयाचे तलावात रुपांतर झाल्यानंतर राजश्री शाहू महाराजांनी जलशयाचे प्रदूषण होऊ नये म्हणून या काठावर असणारे गाव स्थलांतरित केले. त्यावेळी ग्रामस्थांनी पांढरी माती, घडीव दगड, कौले, लाकडी छत आदी साहित्य वापरून मंदिर बांधले होते. हे मंदिर जीर्ण झाल्यामुळे 2003 पासून या मंदिराचे पुन्हा नव्याने बांधकाम सुरू करून जिर्णोद्धाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या पुढाकाराने गाव वर्गणी, देणगीदार यांच्या माध्यमातून मंदिराचे 14 मे 2007 मध्ये बांधकाम पूर्ण करण्यात आल तेव्हापासून या मंदिरामध्ये होमवहन, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. दिवसेंदिवस या सोहळ्याला मोठ्या उत्सवाचे स्वरूप येत आहे. दैनंदिन श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची सालंकृत पूजा बांधण्यात येत असून, पूजेचा मान गुरव समाजाकडे आहे. दररोज सकाळी सात वाजता व सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी श्री महालक्ष्मी देवीची आरती केली जाते. तसेच प्रत्येक अमावस्येला पालखी सोहळ्याचे व प्रसादाचे आयोजन केले जाते.
चौकट
मंदिराचे सौंदर्य खुलले
श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची मूर्ती चतुर्भुज व उभी आहे. उजव्या हातात गदा व डाव्या हातात अमृत पात्र आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून, सिंह वाहन आहे. वज्रलेपाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे मूर्तीला देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. पंधरा हजार चौरस मीटरमध्ये मंदिर आहे. तसेच येथील परिसरामध्ये सात हजार चौरस मीटरचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. मंदिरामध्ये मुख्य गाभारा, सभोवती भव्य मंडप साकारण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वारावर जय विजय यांच्या देखण्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. तसेच मुख्य दरवाजासमोर सिंहाच्या दोन मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. तसेच मंदिराला विविध रंगछटा दिल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये गाभारऱ्यासमोर श्री महादेवाचे देवस्थान आहे. तसेच श्री गणपती, विठ्ठल रखुमाई यांच्या देखण्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंदिर परिसरामध्ये पश्चिम बाजूला वटवृक्षाखाली नरसिंहाची मूर्ती आहे. तसेच या ठिकाणी अनेक विरगळ आहेत.
--
यांनी गावच्या शिरपेचात
रोवला मानाचा तुरा...
येथील अनेक महिलांनी प्रशासनातील सर्वोच्च पद भूषवले आहे. महापौर अश्विनी अमर रामाणे भोगम, पंचायत समिती सदस्या मंगल तिवले, जिल्हा परिषद सदस्या मनीषा टोणपे, करवीर पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील यांनी प्रशासनामध्ये कामगिरी पार पाडली आहे. तसेच राष्ट्रीय खेळामध्ये मैथीली धनाजी तिवले नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवले आहे. तसेच येतील अनेक मुली परदेशात स्थायिक झाल्या आहेत.
कळंबा येथील शशिकांत दिनकर तिवले यांनी गव्हर्मेंटसर्व्हट बँकेचे तीनवेळा अध्यक्षपद भूषविले असून, सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. तसेच, बाबा देसाई यांनी गोकुळचे संचालपद, दिलीप टिपुगडे यांनी पंचायत समिती सभापतीपद भूषविले आहे.
कळंबा गावातील अनेक कुस्तीगीर मल्लांनी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पैलवान अमोल पाटील, सागर इळके, सचिन कदम यासह गावातील अनेक मल्लांनी कुस्ती स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कळंबा गावातील अनेक युवा उद्योजकांनी विविध क्षेत्रात गरुडभरारी घेतली आहे. प्रकाश कदम, बाजीराव पवार, गुंडू पाटील अजित पाटील, पंडित पाटील, भारत पाटील यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये चांगले काम केले आहे. नवीन इमारतींचे अनेक नवीन प्रोजेक्ट साकारण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गिरीश पाटील, अमोल पाटील या युवकांनी ज्वेलरी व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू केली आहे.
-
कोट
चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून तसेच शासनाच्या विविध योजनेतून कळंबा गावच्या विकासासाठी 10 कोटीहून अधिक निधी उपलब्ध झाला आहे. ग्रामपंचायतीच्या स्वमालकीची इमारत उभी राहात आहे. पुढील काळामध्ये गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन योजनेचा आराखडा करण्यात येत आहे. तसेच गावातील सांडपाणी निचरा करण्यासाठी हॉकी स्टेडियम येथे अद्यावत प्रकल्प उभारला जाणार आहे.
-सागर भोगम, सरपंच
-अरुण पाटील टोपकर, उपसरपंच
-दिलीप तेलवी, ग्रामविकास अधकारी
Web Title: Todays Latest Marathi News Klb22b00956 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..