
सिकंदर शेख ने भोला पंजाबीला आसमान दाखवले
01775
कळंबा ः सिकंदर शेख याने एक टाक डावावर भोला पंजाबीला चितपट केलेला क्षण.
कळंब्याच्या मैदानात सिकंदर शेख विजेता
कळंबा या.14 ः श्री महालक्ष्मी अंबाबाई उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कळंबा येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकच्या लढतीमध्ये महान भारत केसरी सिकंदर शेखने हरियाणा केसरी भोला पंजाबीला सातव्या मिनिटाला एकटाक डावावरती चितपट केले.
जिल्हा शहर व राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने जंगी कुस्तीचे मैदानआयोजित केले होते. विजेत्या सिकंदर शेख व उपविजेत्या भोला पंजाबी या मल्लांना माजी सरपंच सागर भोगम, उद्योगपती संतोष लोहार,अरुण टोपकर व मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी एक लाख रुपये रोख बक्षीस देऊन गौरवले.
श्री महालक्ष्मी तालीम, हनुमान तालीम ,श्रीराम तालीम यांच्या वतीने या मैदानाचे आयोजन केले होते. सिकंदर व भोला पंजाबी दोन्ही मल्ल तुल्यबळ असल्यामुळे डाव प्रति डाव टाकत एकमेकांना भिडले. पहिल्या तीन मिनिटांमध्ये भोला पंजाबीने सिकंदरला चितपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चपळाईने सिकंदरने भोला पंजाबीचा ताबा घेत एकटाक डावावरती त्याला अस्मान दाखविले. यावेळी कुस्ती शौकिलानी टाळ्याच्या गजरात दोन्ही मल्लाचे अभिनंदन केले. प्रथम क्रमांकाच्या दुसऱ्या लढतीमध्ये महान भारत केसरी माऊली जमदाडे व उप महाराष्ट्र केसरी योगेश पवार यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. योगेश पवारला दुखापत झाल्याने कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन शशिकांत बोगार्डे याने महाराष्ट्र चॅम्पियन अनिरुद्ध पाटील याला चितपट केले. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन सानिकेत राऊत यांने महाराष्ट्र चॅम्पियन इंद्रजीत मोळे याला आस्मान दाखवले. चौथ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन ओमकार पाटील विरुद्ध युनिव्हर्सिटी चॅम्पियन प्रवीण पाटील यांच्यात बरोबरीत सोडवण्यात आली. पाचव्या क्रमांकाची कुस्ती युनिव्हर्सिटी चॅम्पियन सौरभ पाटील विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन साताप्पा हिरूगडे यांच्यामध्ये सौरभ पाटील यांने गुणावर बाजी मारली. या कुस्ती मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी रामा माने, पैलवान झाकीर सय्यद, तानाजी पाटील, प्रकाश पाटील, राजाराम पाटील कृष्णात तोडकर, गौरव पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेचे आयोजन विशाल तिवले, अमोल पाटील, संग्राम चौगुले, सोमनाथ शिंदे ,अक्षय माने, सागर ईळके, रोहन तिवले, शरद मगदूम यांनी केले.