
सहा लाख महिलांनी केला एसटीने प्रवास..1 कोटी चाळीस लाखाचे उत्पन्न
01788
कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर महिला प्रवासी वर्गाने एसटी हाउसफुल होऊ लागली आहे.
संजय दाभाडे ः सकाळ वृत्तसेवा
महिलांच्या गर्दीने लालपरी हाऊसफुल्ल
कळंबा, ता.26 ः शासनाने महिला सन्मान योजने अंतर्गत वाहतूक भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर महिलांच्या गर्दीने लालपरी हाऊसफुल्ल होत आहे. मागील अडीच महिन्यामध्ये तब्बल पाच लाख 92 हजार 434 महिलांनी एसटीतून प्रवास केला आहे. त्यामधून एक कोटी 41 लाख 26 हजार रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळाले आहे.त्यामुळे कोरोना व कामगारांच्या संपानंतर विस्कळीत झालेल्या एसटीने उत्पन्नाचा टॉप गिअर टाकल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीच्या कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर दिवसभरात शंभर फेऱ्या होतात. या मार्गावर प्रत्येक किलोमीटरला एक गाव येत आहे. तसेच श्री संत बाळूमामा देवस्थान, मौनी महाराज मठ, कोकण परिसर व कर्नाटककडे जाण्यासाठी प्रवासी व भाविकांना हा रस्ता महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये महिला, प्रवासी वर्ग मोठा आहे. राज्य परिवहन महामंडळाने ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 टक्के तर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सवलत योजना जाहीर केली होती. आता शासनाने महिला सन्मान योजना जाहीर केल्यामुळे सरसकट सर्वच महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली आहे. मात्र महिला दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने महिला सन्मान योजना सुरू केल्यामुळे एसटीच्या उत्पन्नाचे चाक अधिक वेगाने धावू लागले आहे.तसेच कमी प्रवासी खर्चात नातेवाईकांच्या भेटीगाठी,तीर्थयात्रा,देवदर्शनासह, पर्यटनाला जाण्याचा मार्ग सुकर झाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चौकट
ओळखपत्राची गरज नाही.
एसटीमधून प्रवास करताना 50 व 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीने प्रवास करायचा असेल तर त्यांना ओळखपत्र दाखवावे लागत होते. मात्र महिलांसाठी सुरू केलेल्या या सन्मान योजनेमुळे कोणत्याही ओळखपत्राची गरज नसेल.
कोट
महिला सन्मान योजनेमुळे जिल्ह्यात एसटीमधून दैनंदिन अडीच लाख महिला प्रवास करत आहेत. त्यामधून दर दिवशी 25 लाखाचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळत आहे.
50 टक्के सवलत दिल्यामुळे एसटीमधून महिला प्रवासी वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ लागली. एसटी महामंडळ प्रवाशांना आणखी चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
-संतोष डोंगरे, विभागीय वाहतूक अधिकारी