
उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्र चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उदघाटन
02589
कोडोलीः येथील कै. रघुनाथ रामचंद्र बुरांडे ग्रंथालय उदघाटनप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील. व्यासपीठावर आमदार विनय कोरे, अमरसिंह पाटील, मकरंद बुरांडे व इतर मान्यवर.
......
ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करणार
मंत्री चंद्रकांत पाटीलः कोडोली येथे बुरांडे ग्रंथालयाचे उदघाटन
कोडोली, ता.६ : ‘मोबाईलमुळे वाचन संस्कृती लुप्त होत असून यासाठी ग्रंथालय नावाची व्यवस्था ही अधिकाधिक आधुनिक केली पाहिजे. नवीन ग्रंथालये सुरू व्हावीत व त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे याकरीता अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचन संस्कृती वाढण्यासाठी फिरते वाचनालय संकल्पना वाढवावी यासाठी माझ्याकडून शंभर पुस्तके भेट देणार आहे,’ असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कोडोली येथील कै. रघुनाथ रामचंद्र बुरांडे ग्रंथालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विनय कोरे व ‘गोकुळ’ चे संचालक अमरसिंह पाटील उपस्थित होते.
स्वागत ग्रंथालयाचे अध्यक्ष मकरंद बुरांडे यांनी केले. ते म्हणाले,‘ बुरांडे ग्रंथालय हे सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या फंडातील पंचवीस लाख रुपये खर्च करून नवीन पिढीमध्ये वाचनाची संस्कृती वाढावी यासाठी व आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधले आहे.’
आमदार विनय कोरे म्हणाले,‘ वाचनामुळे चांगल्या प्रकारे ज्ञान संपादीत करता येते, त्यातून आत्मविश्वास वाढतो. ग्रंथालयांमुळे समाजात जागृतता निर्माण होण्यास मदत होते. वाचकांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी ग्रंथालयाचे योगदान महत्वाचे आहे.’
‘गोकुळ’ चे संचालक अमरसिंह पाटील म्हणाले,‘ अनेक अडचणींवर मात करीत सर्वसोयींनीयुक्त ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध झाल्याने वाचकांना सर्वच स्तरातील ज्ञान मिळविण्यास मदत होणार आहे.’
यावेळी उपसरपंच माणिक मोरे, प्रकाश पाटील, जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय बाजागे, लक्ष्मण कुलकर्णी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिजित पाटील यांनी केले.आभार प्रवीण बुरांडे यांनी मानले.