
कोडोली पार्किंग समस्या विश्वास साळोखे
02595
कोडोलीत वाहतुकीची कोंडी
कोडोली ता. ११ : सुमारे ५० हजारांवर लोकसंख्या आणि दोन आमदार दिलेल्या कोडोलीत पार्किंग व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ‘कोणीही यावे आणि कोठेही वाहन उभे करावे’ अशीच परिस्थिती आहे. पार्किंगची शिस्त लावण्यासाठी ग्रामपंचायत व वाहतूक पोलिस ठाण्यातर्फे पुढाकार घेण्याची गरज आहे.
कोडोलीत १९४५ ला ग्रामपंचायत अस्तित्वात आली. शिक्षण संस्था, औद्योगिक कारखाने, सहकारी संस्था, बाजारपेठ असून नवीन वसाहती झपाट्याने वाढत आहेत. पन्हाळा तालुक्यासह हातकणंगले, शिराळा तालुक्यातील नागरिक बाजारासाठी येतात. येथूनच वाठार- वारणानगर - बोरपाडळे राज्यमार्ग जातो. या रस्त्यावर प्रचंड वाहतूक असतानाही अतिक्रमणे आणि पार्किंग सुविधा नसल्याने अपघात होतात.
गावचे प्रवेशद्वार एमएसइबी फाट्यापासून शिवाजी चौकात जाणारा रस्ता मुख्य रस्ता आहे. हाच रस्ता म्हणजे बाजारपेठ असल्याने रस्त्यावर दोन्ही बाजूला अस्ताव्यस्त वाहने पार्किंग केली जातात. काही दुकानधारकांनी स्टॉल, फलक रस्त्यावर उभे केले आहेत. अतिक्रमणेही झाली आहेत. पार्किंगसाठी स्वतंत्र जागा न ठेवल्याने वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. वाहनधारक, दुकानदार, ग्राहकातील वाद नित्याचाच झाला आहे. बहुतांश घरे बांधताना पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. यासाठी ग्रामपंचायत आणि पोलीसांनी पार्किंगबाबत नियमावली तयार करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीने सर्वच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवावीत. पार्किंग व्यवस्था असल्यास बांधकाम परवाना द्यावा. पार्किंग जागृतीचे फलक ठिकठिकाणी लावावेत.
----
कोट
व्यापारी, पोलिस व ग्रामपंचायतीतर्फे सम-विषम पार्किंगबाबत योग्य निर्णय घेऊ. गुरुवारी आठवडी बाजार सर्वोदय चौकातील गर्दी कमी करण्याच्या यशस्वी प्रयत्न केला आहे
- माणिक मोरे, उपसरपंच, ग्रामपंचायत कोडोली
-----
प्रतिक्रिया
बेशिस्त वाहनांना चाप बसण्यासाठी नाकाबंदी चालू असून, सम-विषम पार्किंगकरिता ग्रामपंचायतीसोबत बोलणी सुरू असून योग्य निर्णय झाल्यावर अंमलबजावणी होईल.
- शीतलकुमार डोईजड, सहाय्यक पोलिस निरीक्षक, कोडोली पोलीस ठाणे