
कूर ग्रामपंचायतीसाठी दुरंगी लढत : माजी जि. प. सदस्य जीवन पाटील व माजी जि. प. उपाध्यक्ष बी. एस. देसाई यांची प्रतिष्ठा पणाला.
नाती रिंगणात, प्रतिष्ठा प्रचारात
कूर येथे मातब्बरांत लढती
अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. १५ : भुदरगड तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कूर ग्रामपंचायतीसाठी चुरशीने दुरंगी लढत होत आहे. येथे नेत्यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात उतरले, त्यामुळे त्यांना विजयासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांच्या आघाडीच्या विरोधात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बी. एस. देसाई यांनी आघाडी केल्याने येथे मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कूर ही तालुक्यातील मोठी व राजकीय घडामोडीचे केंद्रस्थानची ग्रामपंचायत होय. येथील लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांच्या आघाडीतर्फे त्यांचे थोरले भाऊ मदन पाटील हे स्वतः रिंगणात असून विरोधी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बी. एस. देसाई यांनी आमदार प्रकाश आबिटकर व श्री. देसाई यांचा निष्ठावंत सर्वसामान्य कार्यकर्ता नेताजी सारंग यांना सरपंचपदाची उमेदवारी दिली आहे. माजी जि. प. उपाध्यक्ष बी. एस. देसाई यांच्या भैरवनाथ विठूबाई ग्रामविकास आघाडीतून आघाडी प्रमुख देसाई यांचे भाऊ माजी उपसरपंच धनाजीराव देसाई व माजी पं. स. उपसभापती अजित देसाई यांच्या भावजय अनघा देसाई ह्या तर माजी जि. प. सदस्य जीवन पाटील यांच्या महाविकास आघाडीतर्फे माजी सरपंच वसंतराव प्रभावळे व सचिन प्रभावळे हे पितापुत्र व माजी सरपंच उमा चोडणकर, माजी सरपंच सरिता हळदकर यांचे पती संदीप हळदकर रिंगणात आहेत.
--------------
चौकट
नेते दारात, मतदार घरात
कूर येथील ग्रामपंचायतीचे धूमशान सुरू असतानाच गेले पंधरा दिवस चोरट्यानी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. चोरांच्या भीतीने ग्रामस्थ सायंकाळी सात वाजताच दारे बंद करत असल्याने नेते दारात तर मतदार घरात अशी अवस्था झाली आहे.