
शेणखत ठरतेय शेतीस फायदेशीर : शेतकऱ्यांकडून वापर.
04296
कोनवडेत शेणखतास मागणी वाढली
कोनवडे, ता. १६ : रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा पोत खालावत आहे. दर्जेदार व सकस उत्पादनासाठी शेणखत फायदेशीर आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनावरांचे साठवलेले शेणखत शेतीस फायदेशीर ठरत असल्याने शेतकरी शेणखत टाकण्याकडे वळले आहेत.
भुदरगड तालुक्यातील कूर, मिणचे, हेदवडे परिसराला वेदगंगा नदी, दूधगंगा उजवा कालवा, फये व पाटगाव प्रकल्पाचे मुबलक पाणी असल्याने येथे नंदनवन फुलते; पण शेतीमध्ये रासायनिक खातांचा भरमसाट वापर केल्याने शेतीचा पोत घसरत आहे. जमिनीचा घसरत चाललेला पोत नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा मारा कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे बनले आहे. सध्या शेतीत दर्जेदार उत्पादनासाठी शेणखत फायदेशीर ठरत आहे. शेण खताचा वापर झाल्यास शेतीत सोनेरी दिवस येण्यास वेळ लागणार नाही.
ग्रामीण भागात पशुधन मोठया प्रमाणात असल्याने शेणखत उपलब्ध होत आहे. शेणखातास मोठी मागणी आहे. पशुधन कमी असलेल्या पट्टयात शेणखताचा तुटवडा आहे. दोन ते अडीच हजार रुपये ट्रॉलीस मोजावे लागतात. सध्या शेतकऱ्यास शेणखताचे महत्त्व समजू लागले आहे.
---
कोट
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत चालल्यामुळे जमिनीचा पोत बिघडत आहे. उपाय म्हणून एकरी वीस ते पंचवीस गाड्या शेणखत वापरणे गरजेचे आहे. हिरवळीचे पिके ताग, धैचा गाडणे तसेच प्रेसमेड, गांडूळ खत, लेंडी खत यांचा वापर करुन समतोल खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
- सुनील डवरी, कृषी पर्यवेक्षक, भुदरगड
---