नवरात्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सव
नवरात्रोत्सव

नवरात्रोत्सव

sakal_logo
By

लोगो- नवरात्रोत्सव


५३०५४, ५३०६७
श्री अंबाबाईची दुर्गादेवी रूपात सालंकृत पूजा
भवानी मंडपापर्यंत दर्शनरांग, दुसऱ्या दिवशी दीड लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची दुर्गादेवी रूपात सालंकृत पूजा बांधली. दिवसभरात दीड लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. श्रीसूक्त पठणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साक्षीने उत्सवातील उत्साह आता टिपेला पोचणार आहे. मुख्य दर्शनरांगेबरोबरच मुखदर्शनालाही प्रतिसाद मिळतो आहे. मुख्य दर्शनरांग आज भवानी मंडपापर्यंत पोचली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध ठिकाणांहून नवदुर्गा दर्शनासाठी सुविधा उपलब्ध असल्याने आता या माध्यमातूनही मंदिरात गर्दी वाढू लागली आहे.
दरम्यान, ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात कमलपुष्पावरील खडी पूजा बांधली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा सजला.

अष्टभुजा सिंहवाहिनी दुर्गा
करवीर निवासिनी श्री अंबाबाई अष्टभुजा सिंहवाहिनी दुर्गेच्या रूपात सजली आहे. दुर्गा म्हणजे दुर्गम असुराला मारणारे जगदंबेचे स्वरूप महात्म्याच्या अकराव्या अध्यायात देवीने स्वतःच्या भविष्यात्मक अवतारांचा उल्लेख केला आहे. त्या वेळेला पुढे दुर्गमसुराला मारल्यानंतर माझे नाव दुर्गा म्हणून प्रसिद्ध होईल, असे वचन देवीने स्वतः दिलेले आहे. या स्वरूपात भगवती अष्टभुजा धारण करून सिंहावरती विराजमान आहे. हातामध्ये शंख, चक्र, खड्ग, धनुष्यबाण, वरद कमळ, त्रिशूळ, तलवार आदी आयुधे तिने धारण केली आहेत. दुर्गा या नावाने आदिशक्तीच्या दुस्तर म्हणजे अवघड गोष्टींना सुद्धा सोपं करणारी या रूपाचा बोध होतो, असे श्रीपूजक अनिल कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी आणि सचिन गोटखिंडीकर यांनी सांगितले.

उत्सवातील आजचे
सांस्कृतिक कार्यक्रम
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सकाळी आठ वाजता कृष्णविहार भजनी मंडळ, साडेनऊला स्वरगंधा भजनी मंडळ, अकरा वाजता ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ, साडेबाराला विठुमाऊली भजनी मंडळ, दोनला महालक्ष्मी महिला सोंगी भजन, साडेतीनला श्रीराम महिला भजनी मंडळ, सायंकाळी पाचला समर्थ ग्रुप भावगीत गायन, सहाला सायली होगाडे यांचा कथ्थक आविष्कार आणि सायंकाळी सायला शुभांगी मुळे (पुणे) यांचा गीतबहार कार्यक्रम होईल. तुळजाभवानी मंदिरात सायंकाळी पाच वाजता अरुण जेरे यांचे शास्त्रीय संगीत गायन होईल. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री नऊला गडमुडशिंगी येथील रामकृष्ण हरी सोंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल.

यंदा पारंपरिक उत्साहात
बंगाली बांधवांचा उत्सव
पश्‍चिम बंगालमधील भौगोलिक व आर्थिक परिस्थितीमुळे तेथील मजूर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचला असून, त्या त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करतात. लॉकडाउनचा मोठा फटका त्यांनाही बसला. जसे सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत, तसा हा समाजही हळूहळू सावरू लागला आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळात मूळगावी परत गेलेले मजूर आता पुन्हा मोठ्या संख्येने परतले आहेत. गेली दोन दशके या समाजाचा नवरात्रोत्सव येथे साजरा होतो. मात्र, दोन वर्षे हा उत्सव प्रतीकात्मक पद्धतीने साजरा झाला होता. यंदा मात्र पारंपरिक उत्साहात दैवज्ञ बोर्डिंग येथे समाजबांधव उत्सव साजरा करणार आहेत. जिल्ह्यात बंगाली मजुरांची संख्या पस्तीस हजारांवर आहे. शहरातील गुजरी परिसरात बंगालहून आलेल्या कारागिरांची संख्या मोठी असून आता त्यांची कुटुंबेही येथे स्थायिक झाली आहेत. येथील कारागिरांनी मिळून २००० साली येथे दुर्गा उत्सवाला प्रारंभ केला. उत्सवापूर्वी पंधरा दिवस अगोदर कोलकत्त्याहून गंगा नदीतील माती घेऊन मूर्तिकार येथे येतात. मूर्ती साकारून पुन्हा परत जातात. उत्सवापूर्वी दोन दिवस अगोदर ते पुन्हा येतात आणि मूर्तीची रंगरंगोटी व उत्सवाची सर्व तयारी करतात.


रास-दांडियाची धूम
दोन वर्षांनी यंदा रास-दांडियाची धूम अनुभवायला मिळणार आहे. आजपासून शहरातील विविध ठिकाणी रास-दांडियाच्या कार्यक्रमांना प्रारंभ झाला. गल्ली, अपार्टमेंट, सोसायटीत सामूहिक रास-दांडिया रंगणार असून, दांडियाच्या बाजारपेठेतही खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. गुरुवार (ता. २९) पासून शहरात दांडियाचे मेगा इव्हेंट रंगणार आहेत.

पालखी मार्गावर खडे
श्री अंबाबाईच्या पालखी मार्गासह मंदिराला जोडणाऱ्या रस्त्यांवर महापालिकेने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, ते व्यवस्थित न झाल्याने सर्वत्र खडे आणि धुळीचे साम्राज्य आहे. नवरात्रोत्सवात दर्शनासाठी अनवाणी जाण्याची परंपरा असल्याने भाविकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. याबाबत संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.
......................................................
५३०४३
बाळासाहेब ठाकरेंसह
दिघेंवर रांगोळी प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघेंनी आपले संपूर्ण जीवन हिंदुत्व आणि शिवसेनेच्या कार्यास अर्पण केले. धर्मवीर आनंद दिघेंनी सुरू केलेली दहीहंडी, नवरात्रोत्सवाचे लोण अवघ्या महाराष्ट्र राज्यभर पसरले. धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य १९९० पासून बघितले असून, त्यांच्या आठवणी रांगोळी प्रदर्शनातून कलाकारांनी जाग्या केल्या असल्याचे गौरवोदगार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
शनिवार पेठेतील खोलखंडोबा तालीम आणि शिवगर्जना तरुण मंडळ यांचे वतीने नवरात्रोत्सवानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन केले असून, बारा रंगावलीकारांनी रांगोळ्या रेखाटल्या आहेत. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजित जाधव, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, संयोजक सुनील करंबे, राजेंद्र करंबे, सुनील कालेकर, कपिल नाळे, कल्पेश नाळे, संगीता शिंदे, मनाली कालेकर, अनिता सूर्यवंशी, लक्ष्मी वैद्य, अंजना बल्लाळ, श्रुतिका कोळेकर, आरती पेडणेकर, गीता पाटील, प्रियांका आंबेकर आदी उपस्थित होते.

५३०५७

महिला पर्यटकांना
प्रशासनातर्फे भेटवस्तू
कोल्हापूर, ता. २७ ः जागतिक पर्यटन दिन आणि नवरात्रोत्सवानिमित्त श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना मंदिर परिसरात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, पूजा रेखावार उपस्थित होत्या.
महिला पर्यटकांना प्रातिनिधिक स्वरूपात कोल्हापुरी फेटा बांधून स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने देवीचा प्रसाद म्हणून ओटी, अंबाबाईचा फोटो असलेले कॅलेंडर देण्यात आले. कोल्हापूर सराफ संघाकडून कोल्हापुरी साज, ठुशी तर हॉटेल मालक संघाकडून गूळ, काकवी, चटणी, मसाला अशी शिदोरी आणि जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील गड किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तके, अशा एक हजार वस्तूंची भेट देण्यात आली.
कोल्हापूरमध्ये घेण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत यावेळी उपस्थित महिला पर्यटकांनी व्यक्त केले. यावेळी सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, बळीराम वराडे आदी उपस्थित होते.

ठळक घेणे....
५३०४९
प्रतिभा थोरात यांची
बहारदार संगीत मैफल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः पुण्यातील प्रसिद्ध गायिका प्रतिभा थोरात यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी गायनसेवा सादर केली. सुमारे दोन तास रंगलेल्या या बहारदार मैफलीत त्यांनी एकाहून एक सरस भक्तिगीते सादर केली.
‘ओंकार प्रधान’ या गीताने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘माय भवानी’, ‘विठू माऊली तू’, ‘रखुमाई रखुमाई’, ‘फिरत्या चाकावरती’, ‘माझी रेणुका माऊली’, ‘तू बुद्धी दे’, ‘कानडा राजा’, ‘कौसल्येचा राम’, ‘आदिमाया अंबाबाई’, ‘लल्लाटी भंडार’ आदी गीते सादर झाली. ‘अनादि निर्गुण प्रकटली भवानी’ या गीताने मैफलीची सांगता झाली. मिलिंद वेदांते यांचाही स्वरसाज होता. प्रदीप जिरगे (कीबोर्ड), गुरू ढोले (ढोलक), प्रकाश गवळी (ॲक्टोपॅड), अमित कुलकर्णी (तबला), राजू गवळी (ध्वनी) यांची साथसंगत होती. रूबिना बोरकर यांचे निवेदन होते.

पालखीला मोठी गर्दी
श्री अंबाबाईच्या आजच्या पालखीलाही भाविकांनी मोठी गर्दी केली. मंदिराच्या आवारात अधिक गर्दी होत असल्याच्या कारणावरून काल मंदिराचे महाद्वार आणि विद्यापीठ गेट पालखी वेळी बंद करण्यात आले होते. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविकाला दवाखान्यात दाखल करावे लागले होते. त्यामुळे आज पालखीपूर्वी अर्धा तास अगोदरच भाविकांनी हजेरी लावली.

फक्त फोटो अत्यावश्‍यक

53077