
हिंदुत्ववादी निदर्शने
53074
देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करा
हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन; पाकिस्तान ध्वजाची होळी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : दहशतवादविरोधी पथकाने देशभरातून छापे मारून दहशतवादाशी संबंधित १०६ व्यक्तींना अटक केली. यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात राष्ट्रीय तपास यंत्रणा व एटीएस विरोधात वक्तव्ये केली. त्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला आहे; पण या घोषणा देणाऱ्या विरोधात देशद्रोहाची कलमे लावून कडक कारवाई करावी, अन्यथा राज्यभर राष्ट्रसन्मान मोर्चे काढले जातील, अशा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला. ‘पीएफआय’ संघटनेवर बंदी घालवी, अशी मागणी करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ‘पीएफआय संघटने’च्या प्रतीकात्मक पुतळ्याची आणि पाकिस्तानी ध्वजाची होळी करून निदर्शने केली.
कोंढवा (पुणे) येथे पीएफआय संघटनेच्या कार्यालयावर छापे मारून काही व्यक्तींना अटक केली आहे. कोल्हापुरातील ‘पीएफआय’चा हस्तक मौला मुल्ला यालाही अटक केली. त्यांना अटक करताना गर्दी करून पोलिसांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांचीही चौकशी करावी. संघटनेच्या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी येऊ नये. भविष्यात कोल्हापुरात अशा घोषणा ऐकायला मिळाल्या, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे. मस्जिद आणि मदरशात बाहेरून मोठ्या संख्येने येणारे लोकांच रेकॉर्ड तपासून पोलिस यंत्रणेने तपास करावा, असे आवाहन केले.
जिल्ह्यातील मदरशे आणि मस्जिदमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची चौकशी करण्यासही मागणी केली. आंदोलनांत बंडा साळोखे, हेमंत आराध्ये, सचिन साळोखे, महेश जाधव, अशोक देसाई, अवधूत भाटले, प्रदीप उलपे, सुनील पाटील, सिद्धार्थ कटकधोंड, युवराज आपटे, अमोल पालोजी, जयंत जाधव, करण काकडे, सौरभ निकम, सचिन पाटील, भरत काळे, नितीश कुलकर्णी यांचा समावेश होता.