दिवाळी- डॉ. विनोद ठाकूरदेसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी- डॉ. विनोद ठाकूरदेसाई
दिवाळी- डॉ. विनोद ठाकूरदेसाई

दिवाळी- डॉ. विनोद ठाकूरदेसाई

sakal_logo
By

घराण्यांतील सौंदर्यमूल्ये आणि रागदारी संगीत
आपल्या गायकीचा, घराण्याचा गायकाला निश्चितच अभिमान असतो. त्या त्या घराण्यातील बुजुर्ग, ज्ञानी गायकांनी गायकीसंदर्भात एवढे कार्य करून ठेवले आहे, की त्या सर्वांच्या समोर त्या घराण्यातील शिष्य नतमस्तक होतो. त्याला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या गायकीतील चांगल्या गोष्टी, भावलेल्या गोष्टी तो आपल्या गायकीत आणण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या घराण्याशी एकजीव झालेला असतो. अशा स्थितीत ज्या गायक कलाकारांनी इतर घराण्यांच्या गायकीतील चांगल्या गोष्टी आत्मसात
करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपली गायकी वेगळी आणि सुंदर बनवली.
-डॉ.विनोद ठाकूरदेसाई

E-mail: vinod११२२thakurdesai@gmail.com

शास्त्रीय संगीत जेव्हा मी शिकायला सुरवात केली त्यावेळी रागांबरोबर हळूहळू घराणी, त्यांची नावं, त्यांची वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टी माझ्या कानांवर पडू लागल्या. अशाप्रकारे संगीतातील
घरण्यांप्रती माझं कुतूहल जागं होण्यास सुरवात झाली. माझ्या मनाशी नेहमी एकच प्रश्न पडू लागला की, आपण जी गायकी शिकतोय किंवा गातोय ती कोणत्या घराण्याची गायकी आहे? जर
ती एका विशिष्ट घराण्याची असेल तर त्या घराण्याची वैशिष्ट्ये कोणती? जर ती मिश्र घरण्यांची असेल तर ती प्रत्येक घराण्याकडून आपण शिकत असलेल्या गायकीत त्या त्या घरण्यांची कोणती
वैशिष्ट्ये समावेशीत झाली आहेत? अर्थात हे प्रश्न माझ्या गुरुजींना जेव्हा मी विचारायचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांचे एकच उत्तर असे की, ‘मी जे म्हणतो किंवा मी जसं उच्चारण करतो तसं
अनुकरण कर, तुला घरण्यांची वैशिष्ट्ये आपोआप कळतील.’ जसजसा हा गानप्रवास सुरू झाला तसतशी कंठसंगीतात जवळजवळ सोळा किंवा सतरा पेक्षा अधिक घराणी आहेत याचे ज्ञान
झाले. पुढे आमच्या घराण्यात हे उच्चारण चालत नाही, आमच्या घराण्यात हा राग असा गायला जातो, आमच्या गुरूंनी ही बंदिश अशी सांगितली आहे, आम्ही विलंबीत तीनतालमध्येच गातो,
आम्ही झुम‍ऱ्यामध्ये गातो, तर कोणी एकताल किंवा तीलवाड्यात गातो. अशा प्रकारची बुजुर्गांची किंवा घरंदाज तालीम घेणाऱ्यांची चर्चा, विधाने कानांवर पडू लागली. तर दुसऱ्या ‍बाजूला
संगीतातील घराणी आता नामशेष होत चालली आहेत, घराण्यांच्या भिंती आता कोसळल्या आहेत, मी या घराण्याचा हा रंग घेतला आहे, ज्या घराण्याचं जे चांगलं आहे ते आपल्या गायकीत घ्यावं, घराण्यांच्या पलीकडे जाऊन गायकीचा विचार करावा वगैरे बाजुही कानांवर पडू लागल्या. घरंदाज गायकी म्हणजे पाठांतराची गायकी असे मुळीच नाही. घराणे या शब्दातच घरंदाजपणा
हा अर्थ निहित आहे. घरंदाजपणा हा शिस्तीवर अवलंबून असतो. शिस्त ही परंपरेतून आलेली असते. परंपरेचे काही नियम असतात, एक पद्धत किंवा रीतिरिवाज असतात. घराण्यांच्या अगोदर
प्रबंधगायन आणि ध्रुपदगायन या गानविधाही काटेकोर आणि नियमबद्ध होत्या. धृपदाच्या चार ‘बाण्या’ किंवा शैली आहेत. ध्रुपदाचे स्थायी, अंतरा, संचारी आणि आभोग असे चार भाग असतात.
या परंपरेतूनच ख्याल गायकी हळूहळू प्रचलित झाली. या गायकीमध्ये धृपदाच्या बाण्यांप्रमाणे घराणी अस्तित्वात आली. काही धृपद गायकांनी ध्रुपद गायकी सोडून ख्याल गायनास सुरुवात
केली. काही धृपदे त्यातील संचारी व आभोग हे भाग वगळून केवळ स्थायी अंतरा घेऊन ख्याल म्हणून प्रचलित झाली. धृपदातील शब्द, राग व तालातील नियमबद्धता, काटेकोरपणा यामध्ये
ख्यालाने शिथिलता आणली. संगीतात स्वर हा महत्त्वाचा घटक आहे. शब्दांचा काटेकोरपणा थोडा बाजूला सारून स्वरांद्वारे आकृत्या निर्माण करता येतील आणि कल्पनाविलासाला वाव मिळेल
अशा एका घाटाचा उदय झाला. हा घाट म्हणजे आज प्रचलित असलेली ख्यालगायकी होय. संगीतातील आद्य घराणे म्हणजे ग्वाल्हेर घराणे. या घराण्याला घराण्यांची गंगोत्री
मानतात. ग्वाल्हेर घराण्यातूनच इतर घराण्यांचा जन्म झाला. जयपूर-अत्रौली, आग्रा, किराना, पतीयाळा, मेवाती, बनारस, भेंडीबाजार, इंदौर, रामपूर सेहस्वान अशी प्रचलित घराणी आहेत. खरं
तर घराणी असावी किंवा नसावी याबद्दल वेगवेगळी मते आहेत. त्या मतांचा ऊहापोह करण्यापेक्षा ख्यालगायन आणि घराणी यांतील सकारात्मक सौंदर्यमूल्ये कोणती? याबाबत विचार
करणे अधिक योग्य ठरेल. त्याचबरोबर ‘नवीन पिढीला घरण्यांचे सोयरसुतक नाही’ हे विधानही तपासून बघता येईल. कारण इंटरनेटच्या माध्यमातून अनेक बुजुर्ग, घरंदाज गायकांची ध्वनिमुद्रणे
उपलब्ध झाली आहेत. नवीन पिढीलाही आपल्या पूर्वजांनी घराण्यांचा जो शास्त्रशुद्ध ठेवा जपून ठेवला आहे त्या ठेव्याबद्दल आस्था आहे. जुन्या पिढीकडून गायकीतील सौंदर्यमूल्ये त्यांना घ्यावी
वाटतात. परंतु, यांत दोन बाजू आहेत. एक पिढी अशी आहे की ज्यांनी आपल्या एक किंवा मिश्र घराण्यांची गायकी असलेल्या गुरूंनी आखून दिलेल्या गायकीच्या चौकटीत राहून आपली
गायकी, आपल्या पूर्वापार चालत आलेल्या गायनपरंपरेचा वारसा जपणे, समृद्ध करणे यावर भर दिला आहे. तर दुसरी पिढी अशी आहे की ज्यांनी अनेक घराण्यांतून काही सौंदर्यघटक घेऊन
आपली एक स्वतंत्र गायकी, आपलं एक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये त्यांची गायकी कधी यशस्वी झाली आहे तर कधी दिशाहीनही झाली आहे. वरील सर्व बाबी
विचारात घेता घरण्यांनी आपल्याला काय दिलं? याचा ऊहापोह करणे आवश्यक आहे.

१. घरण्यांची सर्वात मोठी देन म्हणजे ख्याल गायकीतील उच्चारण.
पंडित शरच्चंद्र आरोलकर यांनी एका ठिकाणी ख्यालाबद्दल म्हटले आहे की, ‘उच्चारणकलेचा सर्वोच्च बिंदू म्हणजे खयाल.’
हे उच्चारण स्वरसमूहाचे असो किंवा स्वरांमध्ये लपेटलेल्या शब्दांचे असो. उच्चारण हे गुरुने केलेल्या संस्कारातूनच येते. या उच्चारणातील बेहेलावा अंग, गमक, आस, लय इत्यादी घटक
गुरुच्या तालमीतून येतात. पंडित दिनकर कायकिणी म्हणतात की, ‘रागामध्ये जे स्वर आहेत त्यांचे जे रागांग बनते त्या रागांगात स्वराला काय संस्करण (treatment) करायचे आहे ते
ठरते.हे संस्करण मिंडेच्या स्वरुपात असू शकते, आंदोलनाच्या स्वरुपात असू शकते, कणाच्या रूपाने दीर्घ किंवा ऱ्हस्व उच्चारणाच्या स्वरुपात असू शकते किंवा जोरकसपणा अथवा
हळुवारपणाच्या स्वरुपात असू शकते.’ अशाप्रकारचे संस्कार हे संगीत परंपरेतून आलेले आहेत आणि ही परंपरा घराण्यांच्या रूपाने जपली गेली आहे. ख्यालगायकीत बोलांचे उच्चारणही
महत्त्वाचे आहे. पं. गोविंदराव टेंबे यांनी उस्ताद अल्लादियाखाँ साहेबांच्या बोल उच्चारण्याच्या पद्धतीबद्दल लिहिले आहे की, ‘पाण्याच्या सौम्य लहरींवर सोडलेल्या कमळाच्या पाकळ्या जशा
किंचित हेलकावे घेत तरंगतात तसे त्यांचे बोल आंदोलीत असत.’

२. संगीतातील घराणी म्हणजे शिस्त
घराण्यांमुळे गायकावर शास्त्रीय गायनाचे शिस्तबद्ध संस्कार होतात. पण, आज इंटरनेटमुळे अनेक घराण्यांचे किंवा अनेक गायकांचे विपुल प्रमाणात रागगायन ऐकायला मिळत आहे. त्यामुळे एकाच प्रकारच्या गायकीचे संस्कार विद्यार्थ्यांवर किंवा शिष्यावर होत नाहीत. त्यामुळे कधी कधी अर्थपूर्ण रागाची मांडणी, रागाकृतींमधील सहसंबंध,
प्रवाहीपणा, मजकूर (matter) यांचा अभाव दिसतो. सरगमचा अतिरेक, चमत्कृतीपूर्ण बेफाम तानबाजी, तबल्याबरोबरच्या झटापटी, उपशास्त्रीय ढंगाच्या हरकती, यामुळे कधी कधी
ख्यालगायनातील भारदस्तपणा हरवलेला दिसतो. ख्यालगायनामध्ये उपज अंगाला खूप महत्त्व आहे. घरंदाज तालीम देण्यामध्ये काही तंत्रे त्या त्या घराण्याने विकसित केलेली असतात. यामध्ये
बंदिशीच्या माध्यमातून राग उलगडण्याची कला, तानपलट्यांचे विशिष्ट प्रकार, बंदिशीची दमखम, लयीचे आडाखे इत्यादीचे ज्ञान गुरुकडून शिष्याला दिले जाते. या दृष्टीने घराणी खूप
महत्त्वाची आहेत. थोडक्यात घराणी शिष्याला नजर देतात. शेवटी गाण्यात भाव, सुरेलपणा, लयदारपणा असणे खूप महत्त्वाचे आहे. रंजकता हा गाण्याचा स्वभाव आहे.

३.स्वरसप्तक
भारतीय संगीतातील स्वरसप्तक हे नैसर्गिक स्वरसप्तक आहे. स्वरांची साधना करण्यासाठी तानपुरा हे साधन आहे. एकेका सुराचा इतका सूक्ष्म विचार जगातील इतर कोणत्याही गायकीत
झाला नसावा. रागात लागणारे स्वरांचे दर्जे हे रागाचे भावनिक अस्तित्व व वातावरण निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. घराण्यांनी काही रागांमध्ये स्वरांच्या दर्जांचा आणि श्रुतींचा
विचार करून रागाचा आविष्कार उच्चकोटीला पोहोचवला आहे. घराण्यांनी आणि त्या घराण्यांच्या महान कलाकारांनी जपलेला स्वरांच्या दर्जांचा विचार हे पुढच्या पिढीचे धन आहे. त्याचबरोबर
घराण्यांची दुसरी एक देन म्हणजे स्वरलगाव. प्रत्येक घराण्याने रागांमध्ये स्वरलगाव कसा असावा? याबद्दल स्वतंत्र विचार केला गेला आहे आणि तो मौखिकरीत्या पुढच्या पिढ्यांपर्यंत
चालत आला आहे.

४. लयीचे संस्कार
घराण्यांनी महत्त्वाचे संस्कार जर कोणते केले असतील तर ते म्हणजे ‘लयीचे संस्कार’. त्यामुळेच प्रत्येक घराणे ठराविक तालाचा वापर विलंबीत ख्याल सादर करण्यासाठी करते. जसे
जयपूर-अत्रौली घराणे विलंबीत तीनताल, आग्र्याचा झुमरा, ग्वाल्हेरचा तिलवाडा वगैरे. ताल हा ठराविक लय कायम करतो. या विशिष्ट लयीची त्या त्या घराण्यातील बंदिश सादर करण्यासाठी
किंवा आपल्या सौंदर्य कल्पनांची उपज करण्यासाठी गरज असते. त्यातून अर्थपूर्ण स्वरावली निर्माण होतात.

घराण्याच्या पलीकडेही गाण्याचा एक वेगळा आविष्कार असतो. आपल्या गायकीचा, घराण्याचा गायकाला निश्चितच अभिमान असतो. त्या त्या घराण्यातील बुजुर्ग, ज्ञानी गायकांनी गायकी संदर्भात एवढे कार्य करून ठेवले आहे की, त्या सर्वांच्या समोर त्या घराण्यातील शिष्य नतमस्तक होतो. त्याला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या गायकीतील चांगल्या गोष्टी, भावलेल्या गोष्टी तो आपल्या गायकीत आणण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या घराण्याशी एकजीव झालेला असतो. अशा स्थितीत ज्या गायक कलाकारांनी इतर घराण्याच्या गायकीतील चांगल्या गोष्टी आत्मसात
करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपली गायकी वेगळी आणि सुंदर बनवली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे मूळ किरानाचे गायक. पण, त्यांच्या गायकीवर इंदौर घराण्याच्या अमीर खाँ
साहेबांचा प्रभाव होता, तर तानेवर जयपूर-अत्रौली घराण्याच्या सूरश्री केसरबाई केरकरांचा प्रभाव होता, हे त्यांनी मुलाखतींतून आवर्जून सांगितले आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी हे मूळ आग्रा घराण्याचे असूनही त्यांच्यावर ग्वाल्हेर, किराना व जयपूर-अत्रौली घराण्यांचा प्रभाव होता. याशिवाय त्यांनी वेगळा असा अभिषेकी ढंग गाण्यात आणला. रामपूर-सहेस्वान घराण्याचे आजचे
लोकप्रिय शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खाँ यांनी मुलाखतींतून सांगितलं आहे की, त्यांच्या गायकीवर उस्ताद अमीर खाँ आणि पतियाळा घराण्याचे थोर गायक उस्ताद बडे गुलाम अली खाँ
यांचा प्रभाव आहे. पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्यावरही मूळ संस्कार किराना घराण्याचे होते. पुढे त्यांनी जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम घेतली. परंतु, पुढे त्यांच्या गायकीवर वेगवेगळे
संस्कार होऊन निवृत्तीबुवांची लयकारीकडे अधिक झुकणारी अशी स्वतंत्र गायकी निर्माण झाली. गानसरस्वती श्रीमती किशोरीताई आमोणकर यांना आपल्या आई म्हणजे गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांची तालीम होती. परंतु, त्यांनी सर्व घराण्यांचा अभ्यास केला. शिवाय प्राचीन ग्रंथ आणि प्रदीर्घ असे स्वत:चे चिंतन यातून एक स्वतंत्र तसेच परमोच्च आनंद देणारी गायकी निर्माण केली. आज तरुण पिढीवर या गायकीचा खूप प्रभाव आहे. ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर अशा तीन घराण्यांची गायकी असलेल्या पंडित गजाननबुवा जोशी यांचे शिष्य पंडित उल्हास कशाळकर यांनी मूळ गायकी कायम ठेवत इतर गायकीतीतून चांगल्या गोष्टी आत्मसात करून स्वतंत्र सौंदर्यमूल्ये असणारी गायकी आज ते सादर करीत आहेत. किराना व ग्वाल्हेर घराण्यांचे संस्कार असूनही स्वत:च्या उच्चारणाची विशिष्ट शैली निर्माण करून, तसेच उंच, भारदस्त व मधुर आवाजाचा योग्य वापर करून पंडित व्यंकटेशकुमार यांनी नवीन पिढीला आपल्या ख्यालगायकीने वेड लावलं आहे. बनारस घराण्याचे पंडित राजन-साजन मिश्रा यांनी आपल्या दरबारी व भारदस्त खानदानी गायकीने गेली अनेक दशके प्रभावित केले आहे. त्यांचा रंगमंचावरील वावर, शब्द उच्चारण्याचा विशिष्ट ढंग, बंदिशीची मांडणी आणि अत्यंत सुरेल आवाज यामुळे एका आगळ्यावेगळ्या गायकीचा आविष्कार नेहमी ऐकायला व पहायला मिळाला आहे. पंडित जसराज यांची मेवाती घराण्याची गायकी ही सुद्धा अत्यंत प्रभावशाली गायकी आहे. या घराण्याचा नावलौकिक करण्यात पंडित जसराजजी यांचे फार मोठे योगदान आहे. या आणि अशा अनेक प्रभावशाली गायकांनी आपल्या घराण्याच्या पलीकडे जाऊन सौंदर्यकल्पनांचा अत्युच्य दर्जा कायम राखत अतिशय रंजक अशी गायकी सादर केली किंवा आजही करत आहेत. शेवटी घराणी ही येणा‍ऱ्या पिढ्यांवर संस्कारच करत असतात. घराणी म्हटली की कर्मठपणा, शिस्त, नियम हे आलेच. पण, भारतीय अभिजात संगीत हे अथांग सागरासारखे आहे. म्हणून निर्मिती प्रक्रिया अखंड चालू ठेवण्यासाठी घराण्यांच्या पलीकडेही जाऊन गायकीचा विचार केला पाहिजे.