पर्यटनविकासासाठी एका व्यासपीठावर या; उदय गायकवाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटनविकासासाठी एका व्यासपीठावर या; उदय गायकवाड
पर्यटनविकासासाठी एका व्यासपीठावर या; उदय गायकवाड

पर्यटनविकासासाठी एका व्यासपीठावर या; उदय गायकवाड

sakal_logo
By

53472
आजरा : येथील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना उदय गायकवाड. या वेळी उपस्थित तहसीलदार विकास अहिर, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, प्रमोद पाटील व मान्यवर.

पर्यटनातून व्यवसायवृद्धीला वाव
उदय गायकवाड; एकत्र येण्याची गरज, आजऱ्यात कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३० : पर्यटनातून व्यवसायवृद्धी होण्यासाठी मोठा वाव आहे. आर्थिक विकासाबरोबर पर्यावरणाचे संतुलन करून रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे. पर्यटनातून समाजातील सर्व घटकांचा विकास साधता येईल. त्यासाठी आजरेकरांनी एकाच व्यासपीठावर यावे, असे आवाहन पर्यटन व पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी केले.
आजरा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये पर्यटनविषयी कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी तहसीलदार विकास अहिर होते. प्रभारी गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, सहायक गटविकास अधिकारी पाटील, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, नगरसेविका अस्मिता जाधव या वेळी प्रमुख उपस्थित होते.
अहिर यांनी स्वागत केले. गायकवाड म्हणाले, ‘‘आजरा तालुक्यात पर्यटनात काम करण्याची मोठी संधी आहे. या तालुक्यातून जाणारा मार्ग कोकण, गोवा राज्याला जोडणारा असल्यामुळे या मार्गावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. या पर्यटकांना तालुक्यातच थांबवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जेवण-खाणे, राहणे यांसह विविध सेवा पुरवल्यास पर्यटक आनंदाने येथील सेवा सुविधांचा लाभ घेतील. रिक्षावाला, टॅक्सीवाला, हॉटेलवाला यांसह समाजातील विविध छोट्या व्यावसायिकांना रोजगार मिळेल. धार्मिक, पर्यावरणीय, जंगले, पाणवठे, धरणे यांची यादी तालुका पातळीवर तयार करा. या तालुक्यात पर्यटक कसे थांबतील याकडे पहा. त्यांनी आले पाहिजे. जेवण, वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. रानमेवा खाल्ला पाहिजे. तांदूळ, काजू अन्य वस्तू खरेदी करायला हव्यात. याबाबतच्या व्यावसायिकांनी संधी टिपली पाहिजे. तरुणांनी मार्गदर्शक (गाईड) टुर ॲरेंज कर्ते व्हावे. आपण आपला पर्यटनाचा आराखडा तयार करूया व आर्थिक विकासाची संधी साधूया.’’ पर्यावरण अभ्यासक प्रमोद पाटील यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, वेळवट्टी येथील पाटील रिसॉर्ट या अॅग्रो टुरीरिझम केंद्राला भेट देऊन गायकवाड व पाटील यांनी माहिती घेतली. या वेळीही पर्यटनवाढीसाठी चर्चा झाली.
आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे, पाटील रिसॉर्ट व अॅग्रोटुरिझमचे विजयकुमार पाटील, पर्यावरण प्रेमी जी. एम. पाटील, प्रगतशील शेतकरी सूर्यकांत दोरुगडे, विक्रमसिंह देसाई, कर निरीक्षक भोपळे, चित्री अॅडव्हेंचर इको टुरिझमचे व्यवस्थापक धोंडीबा येडगा, आनंदा फडके, डॉ. धनाजी राणे यांसह तालुक्यातील पर्यटन प्रेमी उपस्थित होते.
----------------
चौकट
न्याहरी निवास योजनेचा लाभ घ्या
राज्य सरकारीची न्याहरी निवास योजना आहे. त्याचा लाभ येथील पर्यटन व्यवसाय करणाऱ्यांनी घ्यावा. यामध्ये सहभागी झाले पाहिजे. ही योजना कार्यान्वित करावी, असेही गायकडवाड यांनी सांगितले.