महापालिका कर्मचारी संपावर जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका कर्मचारी संपावर जाणार
महापालिका कर्मचारी संपावर जाणार

महापालिका कर्मचारी संपावर जाणार

sakal_logo
By

महापालिका कर्मचाऱ्यांचा १४ पासून संपाचा इशारा
पदोन्नतीसह विविध मागण्या : प्रशासकांना दिली नोटीस
कोल्हापूर, ता. ३० ः ज्येष्ठता असलेल्या तसेच आश्‍वासित प्रगती योजनेतील व शैक्षणिक अर्हता असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी, यांसह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाने १४ ऑक्टोबरपासून संपावर जाण्याची नोटीस महापालिका प्रशासकांना दिली आहे. याबाबत संघाच्या जनरल कौन्सिलमध्ये निर्णय घेण्यात आला.
संघाने दिलेल्या नोटीसमध्ये ११ मागण्या दिल्या आहेत. अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा निर्णय झाला. पण आजतागायत काहीच कार्यवाही नाही. कनिष्ठ लिपिक, मुकादम कम क्लार्क पदावर जे कामगार शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात. त्यांना आश्‍वासित प्रगती योजना लागू केली आहे. ते वरिष्ठ पदावर काम करत आहेत, पण पदोन्नतीची कार्यवाही ठेवलेली नाही. याबरोबरच सुभाष स्टोअर यंत्रशाळा तसेच इतर आस्थापनावरील रिक्त असणाऱ्या पदावर पदोन्नती द्यावी; तसेच भरतीची कार्यवाही करावी. सातव्या वेतन आयोगातील फरक दिवाळीपूर्वी देण्यात यावा. कायम कर्मचारी, निवृत्त तसेच कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार वाढ केलेल्या महागाई भत्ता फरकाची रक्कमही दिवाळीपूवी द्यावी. कायम कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी १२ हजार तर रोजंदारी, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना दहा हजार दिवाळी तसलमात द्यावी. आरोग्य व पवडी विभागाकडील कर्मचाऱ्यांना खोरी, घमेली, खराटे आदी साहित्य मागणी करूनही दिलेले नाही. ते विनाविलंब उपलब्ध करावे. ३० वर्षांपासून ६२० कामगार रोजंदारीवर काम करत आहेत. त्यांना सेवेत कायम करावे,
ठोक मानधन तत्त्‍वावर अनेक कर्मचारी १० ते १२ वर्षे काम करत आहेत. रिक्त पदांवर त्यांना तत्काळ कायम करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचारी संघाबरोबर प्रशासनाचा करार झाला आहे. त्यानुसार वेतन फरक व प्रॉव्हीडंट फंडाची रक्कम तातडीने मिळावी, अशा मागण्या नोटीसमध्ये केल्या आहेत.

इशारा संपाचा...
महानगरपालिका प्रशासनाचा गाडा हाकणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघाने यावर्षी संपाच्या नोटीस दिल्या. त्यावेळी प्रशासनाशी चर्चा झाल्या व संप स्थगित केला गेला. महापालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे महिन्याचा पगार वेळेवर होत नसताना अन्य आर्थिक मागण्यांबाबत तातडीने निर्णय होईल, असे वाटत नाही.रिक्त पदांवरील भरती, कायम नेमणूक कितपत शक्य आहे, याची माहिती महापालिकेत काम करणाऱ्यांना आहे. दिवाळी तोंडावर असल्याने तसलमातची मागणी केली आहे. ती दरवर्षी दिली जाते. त्यामुळे आता दिलेल्या नोटीसमधून काय साध्य करायचे आहे हे लवकरच समजेल.