जादा परताव्याच्या आमिषाने ४१ लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जादा परताव्याच्या आमिषाने
४१ लाखांची फसवणूक
जादा परताव्याच्या आमिषाने ४१ लाखांची फसवणूक

जादा परताव्याच्या आमिषाने ४१ लाखांची फसवणूक

sakal_logo
By

जादा परताव्याच्या आमिषाने
४१ लाखांची फसवणूक
ग्रोबझ कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेस कंपनीच्या पाच जणांवर आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. विश्वास निवृत्ती कोळी (वय ४५, रा. बावची, वाळवा, सांगली), उज्ज्वला शिवाजी कोळी (रा. यशोदा विश्वास कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत), सौरभ कोळी (२५, रा. बावची, वाळवा), सोमनाथ मधुसूदन कोळी (४०), स्वप्नील शिवाजी कोळी (३८, रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी त्या संशयितांची नावे असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी सांगितले. सर्व संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः बहुचर्चित ग्रोबझ कंपनीतील गुंतवणूक मिळत नसल्याबद्दल तक्रारदारांच्यात चर्चा सुरू आहे. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या आहेत. यासंबंधी शाहूपुरी पोलिस ठाण्यात काल गुन्हा नोंद केला. विश्वास कोळी याची उज्ज्वला बहीण आहे, तसेच स्वप्नील व सोमनाथ भाचे तर सौरभ नातेवाईक आहे. त्यांनी सुरुवातीला शाहूपुरी चौथ्या गल्लीत ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेस कंपनी सुरू केली. त्यानंतर वेल्फेअर कंपनी आणि बँकही सुरू केली. संशयित विश्वास ग्रोबझ समूहाचा मुख्य असून, संशयित स्वप्नील करवीर पंचायत समितीत ग्रामसेवक असल्याची माहिती पुढे येत आहे. संशयितांनी मल्टिलेव्हल मार्केटिंगअंतर्गत वेगवेगळ्या योजनांआधारे गुंतवणुकीवर चांगला परताव्यासह ठराविक काळानंतर मुद्दलही परत देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला परतावा मिळाल्याने गुंतवणूकदारही कंपनीकडे आकर्षित झाल्याचे सहायक पोलिस निरीक्षक इंगवले यांनी सांगितले.
दरम्यान, ग्रोबझ ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती. त्यांना १५ टक्के परतावा मिळणार होता; मात्र संबंधित गुंतवणूकदारांची ४१ लाख आठ हजार २७० रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार २९ जानेवारी २०२१ ते १६ सप्टेंबर २०२२ अखेर घडला, अशी फिर्याद रघुनाथ शंकर खोडके यांनी दिली. त्यानुसार पाचही संशयितांवर फसवणूक, संगनमताने विश्वासघात आणि ठेवीदारांचे संरक्षण कायदाअंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे इंगवले यांनी सांगितले. याबाबत आतापर्यंत १४ गुंतवणूकदारांच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. लवकरच या प्रकरणात मोठा मासा हाती लागण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.


परतावा एप्रिलपासून मिळणे बंद
गुंतवणूकदारांना एप्रिल २०२२ पासून परतावा मिळणे बंद झाले. तेव्हापासूनच संबंधित संशयित पसार झाल्याचे तपासात पुढे येत असल्याचे इंगवले यांनी सांगितले.
दोन बँक खाती गोठवली...
कंपनीसह दोन बँकांमधील खाती पोलिसांनी गोठवली आहेत. त्या खात्यावर अवघ्या काही रुपये शिल्लक असल्याची माहिती पुढे येत असल्याचे इंगवले यांनी सांगितले.

कोट ः
संबंधित कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असेल त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले आहे.
-------