नवरात्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सव
नवरात्रोत्सव

नवरात्रोत्सव

sakal_logo
By

53838
53839
53912
श्री अंबाबाईचा उद्या नगरप्रदक्षिणा सोहळा
दर्शनासाठी मंदिरात तुडुंब गर्दी, अंबाबाईच्या मुखकमलाची एकवीस फुटी प्रतिकृती साकारणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ३) श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘अंबा माता की जय’चा अखंड जयघोष, पोलिस बॅंडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा सोहळा पोलिसांच्या कडेकोड बंदोबस्तात झाला होता. यंदा मात्र हजारो भाविकांच्या साक्षीने हा सोहळा सजणार आहे. या सोहळ्याच्या तयारीला आता प्रारंभ झाला आहे. दरम्यान, आज श्री अंबाबाईची भुक्तिमुक्तिप्रदायिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. ऐतिहासिक भवानी मंडपातील श्री तुळजाभवानीची केळीच्या वनातील फलाहार रूपातील पूजा बांधण्यात आली. अंबाबाई मंदिरात आज दर्शनासाठी पाच लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावल्याची माहिती देवस्थान समितीने दिली.

करवीर क्षेत्राचे माहात्म्य...
करवीर निवासिनी श्री अंबाबाई भुक्तिमुक्तीप्रदायिनी या रूपात आज सजली. अगस्ती ऋषींनी रचलेल्या अष्टकात भुक्ती मुक्ती प्रदे देवी असा उल्लेख केलेला आहे. या भारत भूमीमध्ये अनेक तीर्थं आहेत, कित्येक तीर्थ भुक्ती म्हणजे आयुष्याची सर्व सुखं देतात, भोग देतात तर काही तीर्थ ही मुक्ती देतात, पण करवीर हे एकमात्र असे तीर्थ आहे, जी भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देते. भुक्ती अर्थात जगण्याची सर्व सुखं आणि मुक्ती अर्थात पुन्हा जन्म मरणाचा फेरा न पाहण्याचं शाश्वत वरदान. करवीर क्षेत्री या दोन्ही गोष्टींची प्राप्ती होते, कारण हे क्षेत्र या मोठ्या आईचं अर्थात महामातृकक्षेत्र म्हणून ओळखलं जाते, असे या पूजेचे माहात्म्य असल्याचे श्रीपूजक गजानन मुनीश्वर, रामकृष्ण मुनीश्वर, मुकुल मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

रांगोळ्या आणि प्रकाशझोतही
सोमवारी (ता. ३) रात्री नऊच्या सुमारास अंबाबाईच्या वाहनाचे पूजन होऊन नगरप्रदक्षिणेला प्रारंभ होईल. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गावरून जाताना फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्यांनी देवीचे स्वागत होईल. तुळजाभवानी मंदिरात पानाचा विडा देऊन देवीचे स्वागत होईल. न्यू गुजरी तरुण मंडळातर्फे यंदा नगरप्रदक्षिणा मार्गावर विविधरंगी फुलांमध्ये श्री अंबाबाईच्या मुखकमलाची एकवीस फुटी प्रतिकृती मंडळातर्फे गुजरी कॉर्नर येथे उभारली जाणार आहे. त्याशिवाय विविधरंगी प्रकाशझोत, रांगोळ्या आणि प्रसादाचे वाटपही मंडळातर्फे होणार आहे.

चित्पावन संघातर्फे आज अष्टमी जागर
कोल्हापूर चित्पावन संघाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त उद्या (रविवारी) मंगलधाम हॉल येथे सायंकाळी साडेसात वाजता अंबाबाई दर्शन व घागर फुंकण्याचा अष्टमी जागर सोहळा होणार आहे. भाविकांनी या धार्मिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष नंदकुमार मराठे यांनी केले आहे. संघाच्या वतीने या सोहळ्याचे ऑनलाईन प्रक्षेपणही करण्यात येणार असून, घरपोच प्रसादाची सुविधाही केली आहे. संपूर्ण उपक्रमाचे संयोजन उपाध्यक्ष प्रसाद भिडे, कार्यवाह केदार जोशी आदींनी केले आहे.

पावसाने तारांबळ तरीही उत्साह टीपेला...
नवरात्रोत्सवातील उत्साह आता टीपेला पोहोचला आहे. आज सायंकाळी पावसाने काही काळ हजेरी लावली. त्यामुळे काही काळ तारांबळ उडाली. पण, लगेचच दर्शनासह सर्व व्यवस्था सुरळीत झाली. शेवटच्या तीन दिवसांत भाविकांची दर्शनासाठी आणखी गर्दी होणार आहे. अंबाबाई मंदिरातील रात्रीच्या पालखी सोहळ्यालाही मोठी गर्दी होत असून, शिवाजी चौकातील भजन स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंग येथे आजपासून बंगाली समाजाच्या उत्सवाला प्रारंभ झाला. महिषासूरमर्दिनी दुर्गेची आज येथे प्रतिष्ठापना झाली. शहरातील नवरात्रोत्सव मंडळांबरोबरच विविध संस्थांच्या वतीने रास-दांडिया कार्यक्रमांना रंगत आली असून, सार्थक क्रिएशन्सतर्फे आजपासून समाजाने अद्याप पूर्णपणे न स्वीकारलेल्या ‘एलजीबीटीक्यू’ या घटकांसाठी रास दांडिया कार्यशाळेला प्रारंभ झाला आहे. अंबाबाई मंदिरात रोज पाच सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगले असून, तुळजाभवानी मंदिरातही सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे. श्री अंबाबाई, तुळजाभवानीसह शहरातील नवदुर्गा मंदिरातही गर्दीचा ओघ वाढू लागला आहे.

महालक्ष्मी अन्नछत्राचा
चाळीस हजारांवर भाविकांना लाभ
महालक्ष्मी अन्नछत्रामध्ये गेल्या सहा दिवसांत चाळीस हजारांहून अधिक भाविकांनी मोफत अन्नछत्राचा लाभ घेतला. आज सर्वाधिक दहा हजारांहून अधिक भाविक अन्नछत्रामध्ये आले. अन्नछत्राच्या वतीने मोफत अन्नदानाबरोबरच आता अश्विन पौर्णिमेच्या महाप्रसादाच्या तयारीला प्रारंभ झाला असल्याचे अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले.