मानाचे पान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानाचे पान
मानाचे पान

मानाचे पान

sakal_logo
By

लोगो- मनाचे पान- भाग ९
--
फोटो- 10386
--

दयासागर हुबाळे यांच्याकडे
फेटे बांधण्याचा खास मान

संदीप खांडेकर ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : फेटा बांधणीचा केवळ एक प्रकार नाही. विविध प्रांतांनुसार त्यात वैविध्य आढळते. हे सारे बांधणीचे प्रकार शिकणे तसे अवघड काम. छत्रपती घराण्याच्या सेवेत असलेल्या दयासागर बाळसिंग हुबाळे मात्र पंचवीस प्रकारचे फेटे बांधतात. त्यात त्यांचे कौशल्य असून, नवरात्रोत्सव असो किंवा छत्रपती घराण्यातील अन्य कार्यक्रम खास फेटे बांधण्यासाठी त्यांची हजेरी असते.
धोंडी लक्ष्मण हुबाळे यांचे ते नातू आहेत. श्री. हुबाळे छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत शिकारीच्या ताफ्यात होते. शिकारीची तयारी करण्याचे काम त्यांच्याकडे होते. ते राहायला न्यू पॅलेसच्या परिसरात होते. राजाराम महाराज यांच्या निधनानंतर ते सोन्या मारुती चौकात राहायला गेले. मात्र, त्यांची छत्रपती घराण्याशी नाळ तुटली नाही. मुलगा बाळसिंग हुबाळे यांना घेऊन ते पॅलेसवर छत्रपती घराण्याच्या सेवेत जायचे.
बाळसिंग हुबाळे फेटे बांधण्यात निष्णात होते. काही सेकंदात ते फेटा बांधायचे. त्यांचे हे कौशल्य छत्रपती घराण्याच्या लक्षात आले. त्यांना छत्रपती घराण्यासह तेथे येणाऱ्या पाहुण्यांना फेटे बांधण्याचे कामावर नेमले गेले. त्याचबरोबर वर्षभरातील सणांसह छत्रपती घराण्यातील विविध कार्यक्रमांतही त्यांची हजेरी असायची. त्यांना काष्ठशिल्पे तयार करण्याची विशेष आवड होती. अखेरच्या श्‍वासापर्यंत ते कामही त्यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी मुलगा दयासागर यालाही फेटा बांधण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांचे २०१९ला निधन झाल्यानंतर दयासागरवर फेटे बांधण्याची जबाबदारी आली.
यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या बारशावेळी फेटा बांधण्याच्या कामास त्यांची सुरुवात झाली. विशेष म्हणजे ते राजकीय कार्यक्रमांसह विवाह सोहळ्यात फेटा बांधणीचे काम करतात. विद्यापीठ हायस्कूलमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. धनगरी, शेतकरी, पैलवान, तमासगीर, शाहीर, सरकार, पंजाबीसह राजस्थानातील फेटे बांधणीचे पाच प्रकार त्यांना बांधता येतात. (समाप्त)

कोट
नवरात्रोत्सवात छत्रपती घराण्यासह सरकार घराण्यातील लोकांनाही मी फेटे बांधतो. शिवराज्याभिषेकासाठी दुर्गराज रायगडावरही जातो. दसऱ्याला फेटे बांधण्याची सेवा करण्याची संधी मला मिळते. छत्रपती घराणे आमच्या कुटुंबीयांची आपुलकीने चौकशी करते, त्याचा अभिमान आहे.
- दयासागर हुबाळे