नगरप्रदक्षिणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरप्रदक्षिणा
नगरप्रदक्षिणा

नगरप्रदक्षिणा

sakal_logo
By

फोटो- बी. डी. चेचर
54411
कोल्हापूर ः नवरात्रोत्सवातील अष्टमीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सोमवारी रात्री पारंपरिक उत्साहात झाला. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)
.....

हजारो भाविकांच्या उपस्थितीत नगरप्रदक्षिणा
दोन वर्षांनी अमाप उत्साह, श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : तब्बल दोन वर्षांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा झाला. ‘अंबा माता की जय’चा अखंड जयघोष, ढोल-ताशा पथक, पोलिस बॅंडच्या सुरांसह विविधरंगी विद्युतझोतांच्या साक्षीने हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांनी अनुभवला. यानिमित्ताने सारा नगरप्रदक्षिणा मार्ग फुलांच्या पायघड्या आणि विविधरंगी रांगोळ्यांनी सजला. दरम्यान, श्री अंबाबाईची आज महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. न्यू गुजरी मित्र मंडळाने गुजरी कॉर्नर येथे उभारलेल्या विविधरंगी फुलांतील एकवीस फुटी अंबाबाईची प्रतिकृती पाहण्यासाठीही मोठी गर्दी झाली.
मंदिरात अष्टमीनिमित्त आज पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी झाली. सायंकाळनंतर नगरप्रदक्षिणा सोहळ्याची तयारी सुरू झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नऊच्या सुमारास अंबाबाईच्या वाहनाचे पूजन झाले आणि रात्री साडेनऊच्या सुमारास नगरप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गावरून जाताना हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आणि पुष्पवृष्टीही केली. तुळजाभवानी मंदिरात पान विडा देऊन स्वागत झाले. यावेळी याज्ञसेनीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगर प्रदक्षिणेनंतर देवी मंदिरात विराजमान होताच मंदिराचे चारही मुख्य दरवाजे बंद झाले आणि विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला.
.....

पूजेचे महात्म्य...
महाअष्टमीदिवशी सर्व देवांच्या तेजातून प्रगटलेल्या अष्टादशभुजा अंबाबाई अर्थात दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता. करवीरनिवासिनी अंबाबाई अर्थात परब्रह्माची प्रधान प्रकृती. या रूपामध्ये जगदंबा फक्त देव मानव यांचीच नव्हे, तर अगदी दैत्यांची सुद्धा माता आहे म्हणूनच हे सर्वजण तिला आदराने नमन करतात. अशा परिस्थितीत मार्ग चुकलेल्या आपल्या मुलांसाठी आईला जसे प्रसंगी कणखर व्हावे लागते, एरवीचे सोज्वळ रूप टाकून उग्र रूप घ्यावे लागते. तसेच महिषासुरासारख्या वाट चुकलेल्या पुत्रासाठी करुणामय जगदंबेने महिषासुरमर्दिनीचे उग्र रूप घेतले. शक्तिपीठांच्या परंपरेप्रमाणे करवीरक्षेत्री आदिशक्तीचे स्वरूप असणाऱ्या माता सतीचे त्रिनेत्र पडले. तेथे देवीने महिष मर्दिनीरूपाने विहार केला, अशी आख्यायिका आहे. त्याला अनुसरूनच नवरात्राच्या अष्टमीला करवीरनिवासिनी अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपातली अलंकार पूजा बांधली जाते. ही पूजा गजानन मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
.....

शिवाजी चौकात आतषबाजी

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे सोंगी भजन स्पर्धा सुरू आहेत. आज रात्री अष्टमीनिमित्त येथे भव्य आतषबाजी करण्यात आली.
....

आज नऊनंतर दर्शन

अंबाबाई मंदिरात आज रात्री अष्टमीनिमित्त विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. त्यामुळे उद्या (मंगळवारी) सकाळी नऊ वाजता दर्शनाला प्रारंभ होईल. देवस्थान समितीच्या वतीने आज दुपारी १५ अंध मुले व मुलींना श्री अंबाबाईचे दर्शन घडवण्यात आले. उत्सव काळात देवस्थान समितीच्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ४२ लाखांहून अधिक भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.