फक्त ओनलाईन साठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फक्त ओनलाईन साठी
फक्त ओनलाईन साठी

फक्त ओनलाईन साठी

sakal_logo
By

54556

मैदान जिंकले, पण मृत्यूने हरवले
......
कुस्ती क्षेत्रावर शोककळा ः पंढरपूरच्या पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू
............

कोल्हापूर, ता. ४ : दसऱ्यानिमित्त व्हन्नूर (ता. कागल) येथे झालेल्या कुस्ती मैदानात त्याने कुस्ती जिंकली, पण आज त्याला मृत्यूनेच हरवले. पंढरपूरच्या पैलवानाचा येथील राष्ट्रीय कुस्ती संकुलात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली. मारुती सुरवसे (वय २२) असे या पैलवानाचे नाव आहे. तो मूळचा वाखरी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील रहिवासी आहे. सहा महिन्यांपासून राष्ट्रकुल कुस्ती विजेते पैलवान राम सारंग यांच्या कळंबा येथील राष्ट्रीय कुस्ती संकुलात तो कुस्तीचे धडे गिरवत होता.
व्हन्नूर (ता. कागल) येथे मैदानात त्याने कोंदे एकचाक डावावर कुस्ती जिंकली. यात त्याने शाहू आखाड्याच्या पैलवानाचा पराभव केला. त्यानंतर तो पुन्हा सायंकाळी संकुलात आला. त्याला अस्वस्थ वाटू लागले. तो औषध घेण्यासाठी कळंबा परिसरातीलच औषध दुकानात दुचाकीवरून जात होता. थोड्या अंतरावर गेल्यानंतर तो दुचाकीवरून कोसळला. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला परिसरातील खासगी रुग्णालयात नेले, पण त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
पावणेसहा फूट उंची, ११० किलो वजन आणि व्यायामामुळे कमवलेल्या शरीरामुळे तयार झालेली प्रकृती अशा शरीरयष्टीच्या उमद्या पैलवानाचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मारुतीच्या मृतदेहाचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातवाइकांच्या ताब्यात दिला. यावेळी उपस्थित संकुलातील पैलवानांना अश्रू अनावर झाले. 

चौकट 
१५ दिवसांत दुसऱ्या पैलवानाचा मृत्यू
मृत मारुतीचे वडील गावी शेती करतात. लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्याने सुरुवातीला गावी व नंतर सांगली व आता  कोल्हापूर येथे कुस्तीमध्ये करिअर करण्याच्या हेतूने सरावासाठी पाठवले होते. १५ दिवसांपूर्वी शंकर चौगले या पैलावनाचा बुडून मृत्यू, तर आता मारुतीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोट 
डाएट मॉडिफिकेशन हा प्रकार सध्या घातक ठरत आहे. अनेक वेळा नकळत इन्स्टंट फॅट हा प्रकार रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहाला सुरुवात करते, परिणामी हृदयविकार होऊ शकतो. याचे प्रमाण जास्त झाल्यास परिणामी जीव गमवावा लागू शकतो. यामुळे खेळाडू असो वा सामान्य माणूस नियमित शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे.
- डॉ. अर्जुन अडनाईक, हृदयरोग तज्ज्ञ.