बाजार समिती गाळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती गाळे
बाजार समिती गाळे

बाजार समिती गाळे

sakal_logo
By

लोगो ः बाजार समिती

‘त्या’ गाळ्यांचे भाडे गेले कुठे?
पाऊणकोटी रक्कम नोंदीविना, भाडे घेतले; पण पावत्याच दिल्या नसल्याची स्थिती

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः शेती उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात लेआऊट बाहेरील जागेत बेकायदेशीर गाळे बांधकाम झाले. त्या गाळ्यांचे भाडे अशासकीय मंडळाच्या काळात भरूनही घेतले. मात्र, त्याच्या पावत्या दिल्या नाहीत. तसेच, चार महिन्यांपासून गाळ्याचे भाडेच भरून घेणे समिती प्रशासनाने थांबवले आहे. त्यामुळे गाळ्यांचे भरून घेतलेले भाडे कोणत्या खात्यावर गेले, न भरून घेतलेल्या भाड्याच्या वसुलीचे काय असा विचित्र प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे जवळपास पाऊणकोटींच्या रकमेचा घोळ झाल्याचा अंदाज आहे. यातून गाळेधारक अडचणीत आले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी अथवा न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे.
शाहू मार्केट यार्डात तीन वर्षांपूर्वीच्या संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे गाळे बांधकामाचा घाट घातला. यात काही फळविक्रेत्यांना गाळे देण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार जवळपास पाच ते सात लाख रुपये भरून घेतले. तसेच, तीस वर्षांच्या भाडे करारानेही जागा १६ गाळेधारकांना दिली. पुढे असे गाळे बांधकाम बेकायदेशीर असल्याच्या तक्रारी झाल्या. त्यानंतर जिल्हा निबंधक कार्यालयाकडून चौकशी झाली. त्यातही गाळे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला गेला. त्याच दरम्यान संचालक मंडळाने राजीनामे दिले. त्या जागी प्रशासक व त्यानंतर अशासकीय प्रशासक मंडळाकडे बाजार समितीचा कारभार आला.
याच मंडळाच्या काळात गाळे बांधकाम झाले. ते गाळेधारकांना देण्यात आले. त्यानंतर जवळपास सात ते आठ महिन्यांचे भाडे अशासकीय मंडळाच्या आदेशावरून समितीने भरून घेतले. मात्र, पावत्या दिल्या नाहीत. त्यामुळे ही रक्कम बाजार समितीच्या कोणत्या खात्यावर आहे हेही समजू शकत नाही.
अशात मार्च २०२२ ला अशासकीय प्रशासक मंडळाची मुदत संपली. त्यानंतरचा कारभार बाजार समितीच्या सचिवांकडे आला. त्यानुसार गाळेधारक भाडे भरण्यासाठी गेले. मात्र, समितीने भाडे भरून घेतले नाही. यातून गाळे धारकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

याबाबत बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ‘सध्या बाजार समितीवर संचालक मंडळ किंवा प्रशासक नाहीत, गाळ्याबाबत योग्य ती कार्यवाही व खबरदारी घेतली जात आहे.’ एवढीच माफक प्रतिक्रिया दिली.

चौकट
गाळेधारक झाले हवालदिल
बाजार समिती भाडे भरून घेत नसल्याने यार्डातील जागेवर बांधलेले गाळे अधिकृत मानावे की, अनधिकृत मानावे असा प्रश्‍न आहे. तर, गाळ्यांची कागदोपत्री शासकीय पातळीवर नोंद झालेली नसल्याने हे गाळे बेकायदेशीर ठरतील त्यानुसार हे बाजार समिती प्रशासनाने गाळे पाडून टाकण्याची कारवाई केली तर दिलेली अनामत रक्कम घ्यावी कोणाकडून अशा विविध प्रश्‍नातून गाळेधारक हवालदिल झाले आहेत. काही गाळेधारक जिल्हाधिकारी किंवा न्यायालयात धाव घेण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन घेत आहेत.