शाळा दुरुस्‍तीसाठी हवे ५२ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा दुरुस्‍तीसाठी हवे ५२ कोटी
शाळा दुरुस्‍तीसाठी हवे ५२ कोटी

शाळा दुरुस्‍तीसाठी हवे ५२ कोटी

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद
-----------------
शाळा दुरुस्‍तीसाठी हवेत ५२ कोटी
५२७ शाळांचे प्रस्‍ताव; आणखी शाळांची भर पडणार
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ४ : जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्‍तीचे आतापर्यंत ५२७ प्रस्‍ताव प्राप्‍त झाले आहेत. यासाठी ५२ कोटी रुपयांची गरज आहे. तसेच अजूनही प्रस्‍ताव दाखल होण्याची शक्यता आहे. प्राथमिक शिक्षण विभाग, सर्व शिक्षा अभियान तसेच बांधकाम विभागाने केलेल्या तपासणीच्या आधारे हे प्रस्‍ताव तयार केले आहेत. यापूर्वी दुरुस्‍तीसाठीचा निधी तुकड्यामध्ये वाटप झाल्याने शाळा दुरुस्‍तीचा प्रश्‍‍न निकाली निघाला नाही. दरम्यान, जिल्‍हा परिषदेत प्रशासक आल्यानंतर अत्यंत आवश्यक शाळांचेच प्रस्‍ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शाळा वर्गखोल्या दुरुस्‍तीस प्राधान्य देण्याबाबत सूचना दिल्याने शाळांच्या दुरुस्‍तीचा प्रश्‍‍न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
जिल्‍हा परिषदेच्या सुमारे दोन हजार शाळा असून तेथे दीड लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील अनेक शाळा या शंभर वर्षाहून अधिक जुन्या आहेत. त्या शाळांची पडझड सुरू आहे. डोंगरी भागातील शाळांची दुरवस्‍था आहे. मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे छताला लागणारी गळती, दरवाजे व खिडक्यांची होणारी मोडतोड हा नित्याचा भाग बनली आहे. जिल्‍हा परिषदेत पदाधिकारी कारभार असताना अत्यावश्यक शाळांच्या दुरुस्‍तीला निधी मिळेलच, याची शक्यता फार कमी राहते. ज्या भागातील पदाधिकारी तेथील शाळांना अधिक निधी, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. शाळांची इमारत चांगली असली तरीही तिच्या डागडुजीवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते.
जिल्‍हा परिषदेत प्रशासक आल्यानंतर पहिल्यांदाच ज्या शाळांना खरोखर दुरुस्‍तीची गरज आहे, त्या शाळांचा शोध घेण्याचा प्रयत्‍न झाला. गट शिक्षणाधिकारी व त्यांच्या अधिनस्‍त असलेले अधिकारी, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांना जागेवर जाऊन दुरुस्‍तीचे अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले. अगदी काटेकोरपणे नसले तरी त्यातून अनेक दुर्लक्षित शाळा पुढे आल्या. या शाळांच्या दुरुस्‍तीचे अंदाजपत्रक तयार केले. अशा प्रकारे केलेल्या सर्वेक्षणातून जवळपास ५२७ शाळांच्या दुरुस्‍तीचे प्रस्‍ताव तयार करण्यात आले. यासाठी अंदाजे ५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच, अजूनही काही प्रस्‍ताव येत आहेत. पालकमंत्र्यांनीही शाळा दुरुस्‍तीवर विशेष लक्ष दिल्याने हा प्रश्‍‍न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
--------------
शाळा दुरुस्‍तीचा प्रश्‍‍न गंभीर आहे. अनेक शाळा या शंभर वर्षांहून अधिक जुन्या आहेत. त्यांच्या भिंती, छत खराब आहेत. दरवाजे, खिडक्याही नादुरुस्‍त आहेत. यातील अनेक शाळांची पटसंख्याही चांगली आहे. त्यामुळेच त्यांच्या दुरुस्‍तीला प्राधान्य दिले जात आहे. शाळा दुरुस्‍तीसाठी तुकड्यात निधी देऊन उपयोग होणार नाही. आवश्यक रक्‍कम दिली, तर अशा शाळांना पुढे पाच, दहा वर्षे निधी दिला नाही तरी काही अडचण येणार नाही. त्याच पद्धतीने सध्याचे नियोजन आहे.
- संजयसिंह चव्‍हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी