लम्पी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पी
लम्पी

लम्पी

sakal_logo
By

लम्पीवर गावठी उपचार धोक्याचे


बाधित जनावरांना हळद, बिस्किटे खायला देण्याची हूल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः दीड महिन्यापासून जिल्ह्यातील जनावरांना लम्पी त्वचारोगाची लागण होत आहे. यात काही जनावरांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या विविध भागांत लम्पीचा संसर्ग वाढत आहे. अशा स्थितीत ऐकीव माहितीवर हळद व बिस्किटे जनावरांना खायला घातल्यास संसर्ग कमी होत असल्याची हूल उठली आहे. त्यानुसार काही मालक बाधित जनावरांना परस्पर घरगुती उपचार जनावरांवर करत आहेत, मात्र पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय परस्पर केलेल्या उपचारातून जनावरांच्या आजाराची गुंतागुंत वाढण्याचा धोका आहे. असे प्रकार थांबवले जावेत, लक्षणे असणाऱ्या जनावरांना शासकीय पशुवैद्यकांकडून उपचार घ्यावेत, असे आवाहन पशुवैद्यक करत आहेत.
जिल्ह्यात जवळपास पाचशेवर जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. तीन तालुक्यांतील जनावरे बाधित होण्याचे प्रमाण आहे. अनेक जनावरांचे मालक जनावरांविषयी काळजी करीत आहेत. काहीजण खबरदारीचा भाग म्हणून घरगुती उपाय करण्यावर भर देतात. महिन्याभरात हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ तालुक्यांतील काही गावांत जनावरांना बिस्किट, हळद व अन्य पदार्थांचे मिश्रण करून खायला दिल्यास लम्पीची बाधा होणार नाही, अशी कर्णोपकर्णी आलेल्या माहितीच्या आधारे काही मालक घरगुती स्वरूपात जनावरांना अशी उपाययोजना करू लागले. जनावरांना लक्षणे नसताना कोणताही शास्त्रीय आधार नसलेली औषधे देण्याची गरज नसते. अशातून एखाद्या खाद्य पदार्थाचे प्रमाण वाढल्यास जनावराचे पोट बिघडू शकते. अन्य आजारांची लक्षणे वाढू शकतात.
----
लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात दाखवा
वास्तविक लम्पी आजार नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्‍ह्यात लसीकरण सुरू केले आहे. जवळपास दोन लाख जनावरांना लसीकरण झाले आहे. शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांनी लम्पीवर विशेष उपचार सुरू केले आहेत. जनावरांना लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात दाखवावे, असे आवाहन शासकीय पशुवैद्यकांनी केले आहे.